नांदेड : किनवट सराफांची अशीही बनवाबनवी, २२ कॅरेटच्या नावाखाली ग्राहकांची लूट

मिलिंद सर्पे
Wednesday, 25 November 2020

शहरात आजच्या घडीला जवळपास २० सराफांची दुकाने आहेत.या दुकानांतून सोन्या चांदिची व दागिन्यांची खरेदी विक्री करण्यात येते.

किनवट ( जिल्हा नांदेड ) : शहरातील सराफा व्यापारी हे २२ केरेट शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी केरेटचे सोने ग्राहकांच्या माथी मारुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करीत आहेत, या प्रकाराची संबंधितांनी नोंद घेऊन ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जागृत ग्राहकांकडून केल्या जात आहे.

शहरात आजच्या घडीला जवळपास २० सराफांची दुकाने आहेत. या दुकानांतून सोन्या- चांदीची व दागिन्यांची खरेदी विक्री करण्यात येते. सराफा व्यापारी हे जी. एस. टी. कर चुकविण्यासाठी कुठल्याही ग्राहकाला पक्की पावती देत नाहीत. याबरोबरच शुद्ध सोने देखील ग्राहकाला देत नाहीत. २२ केरेटचे ९१.६ होलमार्क असलेले सोने देण्यापेक्षा २० केरेटचे व तेही होलमार्क नसलेले सोने ग्राहकाला देऊन त्याची आर्थिक फसवणूक दिवसा ढवळ्या करण्यात येते. सोने किती शुद्ध आहे तपासण्यासाठी नांदेड येथे तपासणी यंत्र आहे, परंतु किनवट येथे तपासणीसाठी यंत्र नसल्याने अशुद्ध सोने ग्राहकांच्या माथी मारल्या जाते. तसेच नांदेड येथील भावापेक्षा किनवट येथे सोन्याचे जास्त दर आहेत. सोन्याचे वजन करतांना काट्याला चार बाजुने काच लावण्याची गरज असते. परंतु किनवट येथील दुकानात सोन्याचे वजन करतांना मात्र वरच्या बाजुने काच जाणिवपुर्वक ठेवण्यात येत नाही. तसेच वजन करतांना वरचा पंखा चालु करण्यात येतो यामुळे वजनावरही फरक पडतो.

'सराफा असोसिएशन, किनवट',ही संघटनेची मनमानी

आपल्या गरजेपोटी जेंव्हा ग्राहक हे आपल्याकडील सोने विक्री करीता सराफा दुकानात घेऊन जातो. तेंव्हा त्याला सदरील सोने शुद्ध नसल्याचे व सोन्यात खोट असल्याचे सांगून तेच सोने १८ टक्के कमी दराने खरेदी करण्यात येते, येथेही त्याची सराफा दुकानदार फसवणूक करतो. शहरात सोने- चांदीची विक्री करणा-या व्यापाऱ्यांची 'सराफा असोसिएशन, किनवट',ही संघटना आहे. ही संघटना केंद्रात व स्थानिक सतेत असलेल्या एका पक्षाशी संबंधित आहे. यामुळे कुणीही आमचे काहीच वाकडे करु शकत नाहीत, या अविर्भावात व्यापारी आहेत. यामुळे त्यांच्या मनमानी व्यवहाराला ग्राहक त्रस्त झाले आहेत.

संबंधित विभागाने लक्ष घालून सोने खरेदी विक्री करणा-या ग्राहकांची फसवणूक टाळावी, ग्राहकांना पक्की पावती न देणा-या व्यापाऱ्यांची उत्पन्न कर कार्यालयामार्फत अचानक धाडी घालून चौकशी करावी, याबरोबरच वजने व मापे निरिक्षकामार्फत सोने चांदी काट्याची नियमीत तपासणी करावी, अशी मागणी शहरातील व परिसरातील जागृत नागरिक करीत आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Customers robbed under the guise of 22 carats nanded news