नांदेड : दामिनी पथकाची धाडशी कारवाई, अट्टल गुन्हेगार जेरबंद 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 28 October 2020

पोलिस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांनी सतर्कतेने हा मोठा अनर्थ टळला असून आरोपीला पोलिस कोठडीत पाठविले आहे. चोरट्यांचा हा चोरीचा नवा फंडा ऐकूण पोलिसही आश्‍चर्यचकीत झाले.

नांदेड : शहराच्या असर्जन परिसरातील पद्मजा सिटीजवळ एका डॉक्टरला अडवून धमकी देत त्याच्या मोबाईलवरुन १० हजार ट्रांक्झक्शन करुन घेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई इतवारा उपविभागीय दामिनी पथक आणि नांदेड ग्रामिण पोलिसांनी केली. दामिनी पथक वेळीच त्या ठिकाणी पोहचले नसते तर डॉक्टरला मारहाण झाली असती. पोलिस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांच्या सतर्कतेने हा मोठा अनर्थ टळला असून आरोपीला पोलिस कोठडीत पाठविले आहे. चोरट्यांचा हा चोरीचा नवा फंडा ऐकूण पोलिसही आश्‍चर्यचकीत झाले.

विष्णुपुरी येथून वजिराबादला आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे डाॅ. मोरे सोमवारी (ता. २६) रात्री साडेसातच्या सुमारास स्कूटीवरून येत होते. पद्मजा सिटीसमोर वैभव शहाणे यांच्या शेताजवळ आले असता पाठीमागून बुलेटवर दोघेजण आले. त्यांनी पाठलाग करून त्यांची स्कूटी अडवली. आरोपी जोरावरसिंग सपुरे याने त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने तीनशे रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या मोबाईलवरील गुगल पेवरून जबरदस्तीने दहा हजार रुपये खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. दामिनी पथक घटनास्थळी पोहचताच आरोपी बुलेटवरुन पसार झाला. घडलेला प्रकार पिडीत डॉक्टरला विचारला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

हेही वाचा -  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन वाळू माफियांवर कारवाई करतात तेव्हा... -

आरोपीला पोलिस कोठडी

वेळ रात्रीची असल्याने फौजदार भोंडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरला धीर दिला. त्यानंतर लगेच नियंत्रण कक्ष व नांदेड ग्रामिण पोलिसांना माहिती दिली. लगेच नांदेड ग्रामिणचे गुन्हे शोध पथकाचे फौजदार शेख असद हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात नेऊन संबंधीत पिडीत डॉ. अक्षय मोरे (वय २७) यांच्या तक्रारीवरुन सपुरे याच्याविरुद्ध जबरी चोरीचा व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी जोरावरसिंग सपुरे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान दामिनी पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक यांनी कौतुक केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Damini squad's bold action, hardened criminals arrested nanded news