नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा

प्रल्हाद कांबळे
Thursday, 13 August 2020

काही शेतकऱ्यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या देखील केल्या. अखेर राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

नांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सतत निसर्ग साथ देत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात नापिकी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले आहे. कधी गारपीट, अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. काही शेतकऱ्यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या देखील केल्या. अखेर राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ९७९ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला. शासनाने एक हजार १० कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकऱ्याने विविध बँका व खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला दुष्काळ गारपीट कोरडा दुष्काळ आदी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये कर्जास कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या. शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळायला हवी यासाठी जिल्ह्यात आंदोलने देखील झाली.

हेही वाचासार्वजनिक गणेश मंडळांना परवानगीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

एक हजार दहा कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा 

राज्य सरकारने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी केली गेली. जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ९७९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एक हजार दहा कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. त्यामुळे आता शेतकरी कर्जमुक्त होत आहे.

शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने करून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १५ हजार ६४९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले नाही. त्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी हक्काचे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. अनेक प्रकरणे तहसीलदाराकडे प्रलंबित आहेत शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Debt waiver benefits one lakh 43 thousand farmers in the district nanded news