नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पुराने चार गावातील पिके पाण्यात

गणेश ढेपे
Tuesday, 22 September 2020

जायकवाडी, सिध्देश्वर, येलदरी, तसेच पुर्णा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पात सातत्याने पाणीची आवक वाढतच आहे. त्यामुळे विष्णुपुरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचे आदेश दिलेले होते.

मारतळा (नांदेड) : जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून, दहा दरवाज्याद्वारे नदीपात्रात १ लाख ११५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. ते पाणी लगतच्या नाल्याकडे येऊन सखल भागातील शेतात पुराचे पाणी शिरून कामळज, कौडगाव, चिंचोली व येळी (ता.लोहा) या चार गावातील शेकडो एकरमधील सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुर परिस्थिती वाढत गेल्यास अजून, जास्तीचे क्षेत्र वाढून नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

दिग्रस बंधाऱ्याचे आठ दरवाजे उघडले आहेत. जायकवाडी, सिध्देश्वर, येलदरी, तसेच पुर्णा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पात सातत्याने पाणीची आवक वाढतच आहे. त्यामुळे विष्णुपुरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचे आदेश दिलेले होते. मात्र रविवारी (ता.२०) रात्री पासूनच पुराचे पाणी वाढत कामळज, कौडगाव, चिंचोली, येळी येथील नदीला मिळणाऱ्या नाल्याव्दारे उसावा येऊन पुराचे पाणी उभ्या सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर आदी पिके पाण्यात बुडून या चार गावातील शेकडो एकर जमीनमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
 
नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी

लोहा तालुक्यातील कामळज, कौडगाव, चिंचोली, येळी या नदीकाठावरील चार गावातील उभी पिके पुराच्या पाण्यात गेल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बाधीत पिकांचे पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

बळेगाव बंधाऱ्याचे सोळा दरवाजे उघडले 

उमरी : सध्या जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे सोळाच्या सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसे गोदावरी नदीचे पात्र ३५० मीटर लांब असल्याने आजुबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीला व गावांना धोका होणार नाही. तरीही उपाय म्हणून सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असे तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी पाण्याची पाहणी करताना माहिती दिली.

या वेळी नायब तहसीलदार राजेश लाडंगे, नारावाड आदी उपस्थित होते. या वेळी तहसीलदार माधवराव बोथीकर म्हणाले.  (ता.१५) रोजी अचानक मोठा पाऊस झाला. नदी नाले तुडूंब पाण्याने वाहिले. वरच्या भागातील मोठ-मोठे बंधारेही तुडूंब भरलेले आहेत. त्यांचेही दरवाजे उघडण्यात आले, म्हणून बळेगाव बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded district floods in Godavari river have washed away crops in four villages