नांदेड जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, महिलेचा सापाने, एकाचा विद्यूत शाॅक तर तिसऱ्याचा वाहनाच्या धडकेत 

प्रल्हाद कांबळे
Friday, 31 July 2020

त्यात एका महिलेचा साप चावल्याने, दुसऱ्या घटनेत एका युवकाचा विद्यूत शॉक लागल्याने तर तिसऱ्या घटनेत एका एकाचा बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे.

नांदेड : जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा साप चावल्याने, दुसऱ्या घटनेत एका युवकाचा विद्यूत शॉक लागल्याने तर तिसऱ्या घटनेत एका एकाचा बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उमरी. अर्धापूर आणि लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती असी की, उमरी तालुक्यातील हस्सा येथील मजूर महिला जिजाबाई मरीबा वाघमारे (वय ५०) ही त्याच गावातील शेतकरी गणपत जाधव यांच्या शेतावर गुरुवारी (ता. ३०) सकाळी सोयाबीन निंदणीच्या कामाला अन्य महिलांसह गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती शेतात निंदत असताना तिच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. यात तिचा काही वेळानंतर उपचार सुरु करण्याअगोदरच मृत्यू झाला. याप्रकरणी मरीबा कोंडिबा वाघमारे यांच्या माहितीवरुन उमरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस नाईक श्री गेडाम करत आहेत.

हेही वाचाया शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..?

अर्धापूर तालुक्यातील घटना

दुसऱ्या घटनेत कामठा (बुद्रुक) तालुका अर्धापूर येथील विलास सागर गव्हाणे (वय २३) हा युवक केळी भरण्याच्या गाडीवर लोण (ता. अर्धापूर) शिवारात गुरुवारी (ता. ३०) मजुरीचे काम करत होता. लोण शिवारात केळी भरल्यानंतर उर्वरित गाडी पुन्हा भरण्यासाठी तो ट्रकच्या कॅबीनवर बसून अन्य मजुरांसोबत दुसऱ्या ठिकाणी जात होता. यावेळी रस्त्यातील विद्युत तारेचा अंदाज ट्रकचालकास आला नसल्याने यात कॅबिनवर बसलेल्या विलास गव्हाणे याला जोराचा विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेचा जबर शॉक लागला. काही कळायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. सागर गव्हाणे यांच्या माहितीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार श्री मठदेवरु करत आहेत.

लोहा तालुक्यातील घटना

तर तिसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील बोरगाव (आ) येथील संदीप बालासाहेब पाटील (वय ३५) आणि वैजनाथ एडके हे आपल्याच गावातील पाटीजवळ रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता. ३०) बोलत थांबले होते. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच०४- १९६६) बोलेरो जीप चालकाने आपल्या ताब्यातील जीप भरधाव वेगात चालवून संदीप पाटील या युवकास जोराची धडक दिली. या धडकेत संदीप पाटील याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैजनाथ एडके याच्या फिर्यादीवरुन बोलेरो जीप चालकाविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस फौजदार श्री राठोड करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded district, three people were killed, a woman was bitten by a snake one was electrocuted and a third was hit by a vehicle nanded news