Nanded : डोंगरगावच्या महिलांनी केली बाटली आडवी

दारूबंदीसाठी जिवावर उदार होत अखेर घेतला निर्णय
Nanded Dongargaon women agitation
Nanded Dongargaon women agitation

लोहा : सलग दोन वर्ष आंदोलन करत डोंगरगावच्या (जि. नांदेड) महिलांनी दारूबंदीसाठी जीवाचे रान केले. आंदोलन काळात कित्येकांच्या कपाळावरचे कुंकू पुसले. गावातील व्यसनाधीन झालेली दहा-पंधरा पोरं गमावली. फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचे बायकांनी वार झेलले, पण लढा सोडला नाही.

अखेर गावातील म्हाताऱ्या कोताऱ्यापासून ते सासुरवाशींपर्यंत महिला-पुरूषांनी एकजूट करत लढा दिला. दारूबंदीसाठी हात वर करत ग्रामपंचायतचा ठराव पास केला. शेवटी (ता.२५) ग्रामपंचायतच्या आमसभेत उभी असलेली बाटली आडवी झाली. लोह्यापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमेलगतच्या डोंगरगाव हे कायम दुष्काळ असलेले. तांडा आणि डोंगरगाव असे मिळून साडेतीन हजार वस्तीचे हे गाव आहे. गावात उद्योगधंदे नाहीत, शेतीत बरकत नाही, हाताला काम नसल्यामुळे या गावात अवैध धंदे वाढले परिणामी तरुण मंडळी व्यसनाधीनतेकडे वळली.

बघता बघता पाच - सात वर्षात पंधरा तरुण मुले आणि आठ ज्येष्ठ नागरिक दारूच्या व्यसनामुळे बळी गेले. होत्याचे नव्हते झाले. गावात बायकांच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. येथील नागरिकांनी हताश न होता पुढे आले. तीत वसंत बगाडे, शिवाजी जाधव, तानाजी धर्मापुरे, रोहिदास जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी बगाडे, आनंदराव ढवळे, वसंत ढवळे, बालाजी धर्मापुरे, गणेश तेलंग आदींनी एकजुटीने लढा सुरू केला. हा लढा मोठा अवघड होता. संघर्षाचा होता. गावात अवैध दारूचे दुकान वाढलेली. त्यांना टक्कर देण्यासाठी कोणाच्या बळ नव्हते. शेवटी ज्यांचे कर्ती माणसं कुटुंबाला सोडून गेलेली. परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नव्हती. प्रारंभी सर्व महिलांनी पुढाकार घेतला. दारूबंदी आंदोलनाचा लढा सुरू केला.

बघता बघता येथील महिला सरपंच आम्रपाली धर्मापुरे, उपसरपंच दत्तात्रेय बगाडे, महिला पोलिस पाटील शोभा जाधव यांनी पुढाकार घेतला. कैलास गीरी महाराजांच्या पुढाकारात गावातील ज्येष्ठ नागरिक गोळा झाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावात आमसभा घेतली. आणाभाका घेतल्या. गावातील काही पुरुष मंडळी या गोष्टीला विरोध करत होती. हताश न होता महिलांनी मंदिरालगत एक बैठक घेऊन दारूबंदीचा निर्धार केला. केवळ दारूबंदी करून चालणार नाही. प्रत्येक घरातील जन्मलेल्या मुलींचा सन्मान करावा. आरोग्यदायी गाव करावे. विषमुक्त शेती करावी आणि रोजगार हमीची कामे काढावीत आदी ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आले.

ज्यांच्या घरात दारूमुळे कुटुंबात ‘विष कालवले’ घरे उद्ध्वस्त झाली. या रणरागिनी पुढे सरसावल्या, तीत कालींदा बगाडे, यशोदा ढवळे, लक्ष्मीबाई ढवळे, मुक्ता ढवळे, यशोदा ढवळे, बालिका ढवळे, केराबाई ढवळे, राजाबाई ढवळे, मंगल गीते यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. शाळेच्या मैदानातील रिकाम्या बाटल्या एकत्र केल्या. फुटलेले काचकूर एकत्र जमवले. गावातील व्यसनाधीनतेमुळे मृत्यूचे प्रमाण विस्तारून सांगितले. अवैध धंद्यातील विक्रेत्यांचा वचक कमी केला. दारूबंदीसाठी पोषक वातावरण होताच कायमस्वरूपी दारूबंदीचा ठराव झाला.

आमच्या कार्यकालात कायमस्वरूपी दारूबंदी होत असल्याचा आनंद आहे. कित्येक संसार उठले. ही दशा उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. ग्रामपंचायतीचा ठराव फलदायी ठरला.

- आम्रपाली धर्मापुरे, सरपंच डोंगरगाव.

अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे पाठबळ मिळाले. गावातील अवैध दारू विक्री बंद झाली. मोठे यश मिळाले.

- शोभा जाधव, पोलिस पाटील, डोंगरगाव.

दारूपायी प्रत्येकाच्या संसाराचा विस्कोट झाला. लेकरा बाळांच्या शिक्षणाची आबाळ झाली. गाठीला पैसा राहिला नाही. अशी अवस्था येथील सगळ्या महिलांची आहे. ही परिस्थिती मन उद्विग्न करणारी आहे. त्यासाठी या आंदोलनात स्वतःहून पुढे आले.

- मंगल गीते, गृहिणी, डोंगरगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com