नांदेड : वाळू घाटातील रस्त्यांसाठी नदीच्या दरडीचे खोदकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Excavation work of river for road construction

नांदेड : वाळू घाटातील रस्त्यांसाठी नदीच्या दरडीचे खोदकाम

बिलोली : नदीपात्रातून वाळू वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांसाठी चक्क नदी शेजारील दरडीचे खोदकाम करून शेकडो ब्रास मातीचा विनापरवाना वापर होत आहे. या मातीमुळे नदीपात्र तर धोक्यात येणारच आहे. परंतु त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे खोदकाम केलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भविष्यात अनेकांच्या जिवितास धोकेही निर्माण होण्याची शक्यता आहे.

बिलोली तालुक्यातील मांजरा नदीपात्रातील वाळूची अवैध तस्करी होत आहे. नदीपात्रातील रस्ते तयार करण्यासाठी काही काटेरी वनस्पती तसेच दगड गोट्यांसह मातीचाही सर्रासपणे वापर केल्या जात आहेत. मागील एका दशकापासून नदीपात्रात तयार झालेल्या घाटातील रस्त्यांना आता जंगलाचे स्वरूप आले आहे. नदीपात्रात सर्वत्र काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचा पर्यावरणावर दुरगामी परिणामही होत आहे. रस्ते तयार करण्यासाठी मुरुमाचा वापर केल्या जात असे मात्र सध्या मुरूम उत्खननावर बंदी घातल्यामुळे ठेकेदाराने घाटातील रस्त्यांसाठी चक्क दरडीचे खोदकाम करणे सुरू केले आहे.

कंधार-लोहा मतदार संघाच्या एका विद्यमान आमदाराच्या नावाचा वापर करून गंजगाव येथील एक वाळू घाट सुरू आहे. येथील खासगी वाळू ठेकेदाराने प्रारंभी पासूनच प्रशासनावर कुरघोडी करत वाळू उपशासाठी निश्चित केलेले क्षेत्र सोडून आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेतील वाळू उपसा केला आहे. वास्तविक पाहता ताबा एका ठिकाणी तर वाळू उपसा दुसरीकडेच हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे.

येथील वाळू उपसाची मर्यादा संपलेली असतानाही संबंधित ठेकेदाराने आर्थिक तडजोडी करून महसूल, पोलिस व आरटीओ प्रशासनाला हाताशी धरून वाळूची अमाप लूट केली आहे. संबंधितांच्या वाळू घाटातील वाळू संपलेली असतानाही त्याने अन्य लोकांना हाताशी धरून नदीपात्रात वाळू दिसेल तिकडे रस्ते तयार करून ठेवले आहेत. त्यासाठी चक्क मांजरा नदीपात्रातील दरडीचे खोदकाम करून पंधरा ते वीस फूटाचे मोठमोठे खड्डे तयार केले आहेत. त्यामध्ये पाणी साचून भविष्यात अनेकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर तत्काळ बंदी घालून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.

Web Title: Nanded Excavation Work Of River For Road Construction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top