नांदेड : संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण होण्यास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी- शिक्षक संघटना

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 November 2020

शासनाने सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2007 दिली होती. तथापि संगणक अर्हता उत्तीर्णबाबत शासन निर्णयातील तरतुदी व निर्देशांबाबत राज्यातील बहुतांश शिक्षक व कर्मचारी अनभिज्ञ होते.

नांदेड - राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता (एम.एस.सी.आय.टी.) परीक्षा उत्तीर्ण होण्यास शासनाने मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे नुकतीच केली आहे.

शासनाने सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2007 दिली होती. तथापि संगणक अर्हता उत्तीर्णबाबत शासन निर्णयातील तरतुदी व निर्देशांबाबत राज्यातील बहुतांश शिक्षक व कर्मचारी अनभिज्ञ होते. तसेच  तत्कालीन संबधित प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत वरील शासन निर्णयातील निर्देशांचा उल्लेख करुन मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करुन ते सादर करण्याची लेखी सूचना सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक होते. तसेच बहुताश शिक्षकांच्या नियुक्ती आदेशावरही संगणक अर्हता प्रमाणपत्र आवश्यक असल्याबाबतची अट कोठेही नाही. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी संघटना अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे.

वरील मुद्यांचा विचार करून व सध्याच्या कोवीड-19 आजाराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आणि राज्यातील प्राथमिक शिक्षक खेडोपाड्यात व डोंगराळ भागात काम करीत असल्याने सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात पुरेशी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसल्याने संगणक अर्हता प्रमाणपत्र प्राप्त कण्याकरीता 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी मागणी संघटनेने निवेदनात केली होती. निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागांनाही पाठवल्या होत्या.

हेही वाचा -  कोर्टाच्या आदेशाशिवाय धाड टाकल्याने प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला लोणीकरांनी झापले, ऑडिओ क्लिप व्हायरल -

महाराष्ट्र शासनानाच्या सामान्य प्रशासन विभाग कडील दि. 26 /11 /2020 च्या शासन निर्णयानुसार सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यास अंतिम मुदत 31 डिसेंबर 2007 असून मुदतीत अर्हताधारण न केलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ वसूल करण्याचे निर्देश दिले होते. संघटना प्रतिनिधींचा दबाव पाहून शासनाने दि.27 रोजी कालचे परिपत्रक स्थगित केल्याचे परिपत्रक काढले आहे. पण स्थगिती हा कायस्वरूपी उपाय नसून ती तात्पुरती मलमपट्टी असल्याने मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचा शासन निर्णय पारीत होणे आवश्यक असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी सांगितले.

निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश सनकर, राज्य महिलाध्यक्षा अलका ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, महिला राज्य कार्याध्यक्षा सुनंदा कल्याणकस्तुरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रूखमा पाटील आदींच्या सह्या आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा नेते गनु जाधव, कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, सल्लागार बी. टी.केंद्रे, संपर्कप्रमुख सुरेश मोकले, तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील, राजकुमार बाविस्कर, नागनाथ गाभणे, केशव कदम, जनार्धन कदम, अरूण वडजे यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Extension should be given till March 2021 to pass Computer Qualification Exam- Teachers Association nanded news