
या प्रकरणी सोनखेड आणि कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
नांदेड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या काही थांबता थांबेनात. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. २० ते २१ जानेवारीच्या दरम्यान जानापुरी (तालुका लोहा) शिवारात घडली. दुसर्या घटनेत कंधार तालुक्यातील हाडोळी परिसरात तलावात बुडून जावयाचा मृत्यू. या प्रकरणी सोनखेड आणि कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शेतकरी तिरुपती परसराम कदम (वय २७) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी व होत होती. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. नेहमीच नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे त्यांनी आपला घरगाडा चालविण्यासाठी कर्ज काढले. शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड त्यांना करता येत नव्हती. या तणावातून त्यांनी आपल्याच शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माधव परसराम कदम यांच्या माहितीवरुन सोनखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर करत आहेत.
जावयाचा सासुरवाडीत मृत्यू
दुसर्या घटनेत कंधार तालुक्यातील कुरुळा येथील यादव रामा कांबळे (वय ३०) हे आपली सासुरवाडी हाडोळी येथे आले होते. ते ता. २० जानेवारीच्या सकाळी शौचालयास गेले होते. शिवारात असलेल्या एका पाण्याच्या तलावातून ते बाचलीमध्ये पाणी काढत असतांना त्यांचा तलावामध्ये पाय घसरुन तोल गेला व ते त्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. घटनेची माहिती भुजंग कांबळे यांनी कंधार पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार श्री चोपडे करत आहेत.