नांदेड : ई-पीक पाहणीअंतर्गत पेरा नोंदणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded farmer e-crop inspection

नांदेड : ई-पीक पाहणीअंतर्गत पेरा नोंदणी सुरू

नांदेड - ई - पीक पाहणी अंतर्गत राज्यात खरिप हंगाम २०२२-२०२३ साठी पीक पेरा नोंदणीची सुरुवात सोमवारपासून (ता. एक ऑगस्ट) झाली आहे. यंदा मोबाईलच्या माध्यमातून पेरा नोंदणीसाठी सुधारीत व्हर्जनचे ॲप तयार केले आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदणी करण्याचे आवाहन महसूलसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्यात ता. १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला ता. १५ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होतील. मागील वर्षी या प्रकल्पात एक कोटी ११ लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणीतंर्गत मोबाईल अॅपमध्ये नोंदणी केली होती. शेतकर्‍यांनी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास प्रतिसाद दिला होता. यात खरीप हंगामात ९९ लाख ५७ हजार ९४४ हेक्टर, रब्बी हंगामात २२ लाख ५२ हजार ५६ हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये दोन लाख ९१ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत ४४ लाख १२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी केली होती.

या प्रमाणेच खरीप हंगाम २०२२ मध्ये ई - पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्याची कार्यवाही ता. एक ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. या सुधारीत अॅपमध्ये शेतकर्‍यांच्या प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. पेरा नोंदणीसाठी पिकाचा फोटो घेतांना ते फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पेरा नोंदणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे लक्षात येईल. त्यामुळे पेरा नोंदविण्यासाठी आता त्या क्षेत्रातच जावून पेरा नोंदवावा लागणार आहे.

शेतकर्‍यांनी नोंदलेला पेरा स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, त्याची गाव नमुना नंबर बारामध्ये नोंद होणार आहे. शेतकर्‍यांनी खरिपातील सर्वच पिकांचा पेरा ई-पीक पाहणीअंतर्गत नोंद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

सुविधायुक्त सोपे, सुलभ अॅप

शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ अॅप तयार करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन - दोन विकसित करण्यात आले आहे. हे सुधारित मोबाईल अॅप ता. एक ऑगस्टपासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Web Title: Nanded Farmer Ecrop Inspection Under Sowing Registration Started

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..