Nanded : बळिराजाचा ‘घास’ मातीमोल होणार

माहूर तालुका : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरी संकटाची मालिका
Nanded farmer heavy rain crop damage soybeans loss
Nanded farmer heavy rain crop damage soybeans loss

माहूर : गेल्या महिन्याभरापासून दमदार बरसणाऱ्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेले आणि कापणी केलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. कापणी झालेल्या पिकांची सवंगणी करणेही शक्य होणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यापुर्वीच तोंडचा घास हिरावला गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना किडीने आक्रमण केले. गाठीला असलेले सारे खर्च करून फवारणीची तजवीज केली जात असतानाच दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने माहूर परिसरात धुमाकूळ घातला आहे.

आजूबाजूच्या भागात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे पीके जमीनदोस्त झाली आहेत. ओब्या चिखलात रुतल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

तर कापणीनंतर शेतात पडून असलेल्या सोयाबीनच्या कडपा पाण्यावर तरंगू लागल्या आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटू शकतात. तर कापासाचे बोंड सडण्याचा धोका असल्याचे आता तज्ञ सांगत आहेत. सोयाबीनला नगदी पीक म्हटले जाते.

पण पिकले तर सोन्यासारखे अन्‌ बुडाले तर धुयधानी. यंदा संपूर्ण माहूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हाच अनुभवला आला आहे. कशाबशा झाडांना भरघोस शेंगा लगडल्या. मात्र, वातावरणातील बदलामुळे चक्क सोयाबीनच्या हिरव्या शेंगातून कोंबे निघालीत. शेतकऱ्यांना पहिला मार सोयाबीन बियाण्याने दिला. पावसाची साथ मिळत असताना कीडीने हल्ला केला.

विपरीत परिस्थितीत सोयाबीन पीक टिकून राहिले. शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पावसाळी वातावरणामुळे आर्द्रता निर्माण झाली व या अर्धवट परिपक्व हिरव्या शेंगाच्या दाण्यांतून कोंब बाहेर येण्याची परिस्थिती आता निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत आहे. या प्रकाराने माहूर तालुक्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला मोठा झटका बसला आहे.

दरवाढीचा धोका

गेल्या वर्षी सोयाबीनला जास्त दर मिळाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची लागण जास्त क्षेत्रात झाली आहे. अनेक पिकेही चांगली होती; पण पावसाने या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाल्याने भविष्यात सोयाबीन व इतर पीकांचे दर वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पावसाच्या नुकसानीची हवी मदत

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. मात्र संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांचे क्षेत्र मोठे आहे. या संदर्भात अजूनही शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने मदतीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com