esakal | नांदेड : शेतकऱ्यांनो, हरभरा पिकावरील घाटे अळीचे असे करा व्यवस्थापन 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

शेतकऱ्यांनी उत्पादनातील होणारी मोठी घट रोखण्यासाठी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

नांदेड : शेतकऱ्यांनो, हरभरा पिकावरील घाटे अळीचे असे करा व्यवस्थापन 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  सद्यस्थितीत बहुतांश भागात हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असून प्रामुख्याने घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठी घट येऊ शकते.  त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादनातील होणारी मोठी घट रोखण्यासाठी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कृषी कीटकशास्त्र विभागाचे डॉ. संजीव बंतेवाड यांनी सांगितले की, घाटेअळी ही कीड बहुभक्षी आहे. हरभरा पिकाशिवाय तूर, वाटाणा, करडई, टोमॅटो आदी पिकांनाही ही अळी  नुकसान पोहचवते. विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अधिक प्रादुर्भाव आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत प्रादुर्भाव नुकसानकारक ठरतो. लहान अळ्या सुरवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यात छिद्र पाडून त्यात डोके खुपसून आतील दाणे खातात. साधारणतः एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते.

हेही वाचा - आमदार रत्नाकर गुट्टेना ईडीचा झटका, अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त, परभणी जिल्ह्यात खळबळ

यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केल्यास उघडे पडलेले किडींचे कोष पक्षी वेचून खातात. शेताच्या बांधावरील कोळशी, रानभेंडी, पेटारी ही पर्यायी खाद्य तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दीड फुट अधिक उंचीचे इंग्रजी ‘टी’ अक्षराच्या आकाराचे १५ ते २० पक्षी थांबे प्रति एकरी लावावेत. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत.

हे देखील वाचाच नांदेड : महिलांचे दागिणे लंपास करणारे विमानतळ पोलिसांच्या तावडीत, मिळाली कोठडी

तसेच पिकाच्या सुरवातीस पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम पाच मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एचएनपीव्ही ५०० एल.इ. १० मिली प्रति १० लिटर पाण्यात पाच ग्राम नीळ टाकून सायंकाळी फवारणी करावी. ही फवारणी पिकावर प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी व्यवस्थापन होते. बिव्हेरिया बॅसियाना एक टक्के विद्राव्य सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.  किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

loading image