नांदेड: हळदीमुळे शेतकरी पिवळे, मागणी वाढल्याने हळदीला तेजी; क्विंटलचा दर आठ हजारांवर

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्ह्यात हळद, उस आणि केळी या पिकांचे उत्पादन अधिकप्रमाणात घेण्यात येते. मात्र मागील काही काळात या उत्पादनाला चांगला भाव मिळत नव्हता. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र आता हळदीला चांगला भाव मिळत आहे. गेल्या आठ महिन्यात नांदेड जिल्ह्यात हळदीला दहा वर्षातील निचांकी दर मिळत होता. मात्र, हळदीला विदेशात व देशांतर्गत मागणी वाढल्याने आता दरामध्ये तेजी दिसून येत आहे. साडेचार ते पाच हजार प्रति क्विंटलवर आलेला दर आता साडेसहा ते आठ हजारापर्यंत आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हळदीला मिळत होता निचांकी दर

कोरोनामुळे राज्यात आणि देशात करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका हा शेती व्यवसायालाही बसला. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी प्रति क्विंटल केवळ चार ते साडेचार हजार इतकाच दर मिळत होता. हा दर मागील दहा वर्षांतील सर्वात कमी दर होता.

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात हळदीचे मोठे उत्पादन

हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषध निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पीक आहे. हळद हे ऊसाला पर्यायी पीक असून हळदीचे पीक ऊसापेक्षा कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जाते.

साधारणपणे असा असतो लागवडी खर्च

हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे 10 ते 11 महिन्यांचा कालावधी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च 50 ते 60 हजारापर्यंत येतो. यामध्ये बियाणे खरेदी, लागवड, खते, औषधी फवारणी, मजूरी , काढणी आणि हळद काढल्यानंतर शिजवणे तसेच फिनीशिंग प्रक्रियेपर्यंतचा खर्च समाविष्ट आहेत. हळदीचे चांगले उत्पन्न झाले तर ते एकरी 25 ते 30 क्विंटलपर्यंत मिळते. साधारणपणे प्रत्येक क्विंटलला तीन हजार लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो. हे सर्व गणित विचारात घेत हळदीला किमान सात ते आठ हजार भाव मिळाला तरच हे पिक शेतकऱ्यांना परवडते, त्यापेक्षा कमी भाव मिळाला तर उत्पादन खर्चही निघत नाही.

विदेशात वाढली मागणी

पाश्चिमात्य देशात कोरोनाची परिस्थिती अजूनही म्हणावी तितकी आटोक्यात आलेली नाही. हळद हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पीक आहे. त्यामुळे विदेशातही मागणी वाढत आहे. यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

येणाऱ्या काळातही चांगले भाव मिळण्याची शक्यता

यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे देशातील उत्पादनही घटणार आहे. त्यात देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. टाळेबंदीच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हळदीला तेजी मिळत असल्याने दिलासादायक चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com