शेणखतालाही आलाय सोन्याचा भाव

पशुधनात घट झाल्याने खताचा तुटवडा : पेट्रोल-डिझेल दरवाढीचाही परिणाम
Fertilizer shortage decline in livestock inflation
Fertilizer shortage decline in livestock inflationsakal

नांदेड : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाकडे आपला कल वळविला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकऱ्यांनी यंदा शेणखताचा वापर वाढविला आहे. शेतकऱ्यांकडे पशुधन कमी झाल्याने शेण खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेण खताचे भाव गगनाला भिडले आहेत. या तुटवड्यामुळे सद्यस्थितीत शेण खताला ‘सोनेरी दिवस’ आल्याचे दिसत आहे.

रासायनिक खतांचे वाढते दर व त्यामुळे होणारा पिकावर परिणाम याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेणखत वापरणे सुरु केले आहे. शेणखताला मागणी वाढल्याने दरही वधारले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्चही वेगळा करावा लागत आहे. सतत डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे भावही आता वाढले आहेत. सध्या ट्रॅक्टरद्वारे मशागतीसाठी एकरी दीड ते दोन हजार रुपये खर्च करावा लागत आहे.

परिणामी वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय शेती खर्चात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

काय आहे कारण

पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेले पशुधन आता कमी झाले आहे. जिल्ह्यात हजारो एकर शेती विविध प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांच्या हातातून गेली. शेतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, सगळीकडे जमिनीचे झालेले सपाटीकरण, सिमेंटीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाने घेतलेल्या वेगामुळे पशुंना पुरेसे पाणी आणि चारा मिळणे कठीण जात असल्याने पशुधनाअभावी दिवसेंदिवस शेणखताचा साठा कमी होत आहे. सद्यस्थितीत शेणखताचे भाव प्रति ट्रॅक्टर ट्राॅली दीड ते दोन हजार रुपयाला मिळत आहे.

शेणखत वापरण्याचे फायदे

बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे होते.

शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र शोषून घेता येते.

- डाॅ. अविनाश कुलकर्णी कृषीतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com