नांदेड : दिवाळी निमित्ताने अन्न व औषध प्रशासन सजग, ७५ दुकानांची तपासणी, १५ दुकानांना नोटीसा

प्रल्हाद कांबळे
Thursday, 12 November 2020

जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ७५ अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच ७४ दुकानांची तपासणी करुन त्यातील पंधरा दुकानांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यामुळे अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

नांदेड : दिवाळी व इतर सणाच्या औचित्याने नागरिकांच्या आरोग्याला अन्न पदार्थामधून बाधा पोहचू नये म्हणून अन्नपदार्थांची व संबंधित दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ७५ अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच ७४ दुकानांची तपासणी करुन त्यातील पंधरा दुकानांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यामुळे अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

दिवाळी व येणाऱ्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर काही व्यापारी आपल्या दुकानात भेसळयुक्त अन्नपदार्थ ठेवून ग्राहकांच्या माथी मारतात. परंतु हे अन्नपदार्थ शरीरासाठी घातक असल्याने ते ग्राहकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सतत अशा दुकानावर करडी नजर ठेवून आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात या विभागाने विशेष मोहीम राबवून ७५ विविध दुकानातील संशयास्पद अन्नपदार्थ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

हेही वाचा खासदार हेमंत पाटील यांच्या मदतीने कॅन्सरग्रस्त रुग्णाला सहा लाखाची आर्थिक मदत -

या अन्न पदार्थांचे घेतले नमुने

ज्यात खाद्यतेल २० नमुने, मिठाई आठ, रवा सात, मैदा सहा, बेसन पाच, दूध पाच, मसाले आठ, पाणी एक, तूप चार आणि इतर ११ अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या तपासणीत वरील पदार्थांमध्ये काही भेसळ आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. हे नमुने तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील ७४ दुकानांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी पंधरा दुकानांमध्ये मालात भेसळ आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

येथे क्लिक करानांदेड : राष्ट्रीय महामार्गावर सकाळी झालेल्या अपघातात एक ठार, दोन गंभीर -

ग्राहकांनी सतर्कता बाळगावी

दिवाळी हा महत्त्वाचा सण असून या सणांना मिठाई व अन्य अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेतून खरेदी करत असतात. भेसळयुक्त अन्नपदार्थ नागरिकांना बाजारपेठेत मिळू नयेत व संबंधित दुकानदाराने अशा प्रकारचा गोरखधंदा करु नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला असून कोणत्याही दुकानदारांनी भेसळयुक्त माल विक्री करु नये यासाठी ते काळजी घेत आहेत. दोन दिवसापूर्वीच श्री. काळे यांनी आकाशवानीद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थबद्दल नागरिकांनाही संशय असल्यास त्यांनी संबंधित विभागास किंवा अन्न सुरक्षा निरीक्षक प्रवीण काळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Food and Drug Administration alerted on the occasion of Diwali, inspection of 75 shops, notice to 15 shops nanded news