
गावगाड्याचा ‘मूखीया’होण्याचा बहूमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गावचा कारभारी निवडण्यासाठी भावी कारभारी गावातल्या ‘कारभारात’मश्गूल झाल्याचे चित्र दिसून सध्या गावा गावात दिसुन येत आहे.
मालेगाव (जिल्हा नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आगामी काळात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषगांने ग्रामीण भागातील वातावरण गूलाबी बोचऱ्या थंडीत चांगलंच गरमागरम होतांना दिसत आहे. गावगाड्याचा ‘मूखीया’होण्याचा बहूमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गावचा कारभारी निवडण्यासाठी भावी कारभारी गावातल्या ‘कारभारात’मश्गूल झाल्याचे चित्र दिसून सध्या गावा गावात दिसुन येत आहे.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्या आणि विकासाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी प्रारंभी गावात ‘मानकरी’असायचा, पारावर बसून तो जो म्हणेल ती पुर्वदिशा असायची. हळूहळू लोकशाही मार्गाने गावात सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. ती आजपर्यंत तशीच कायम आहे. दरम्यान साध्या पध्दतीने निवडणुका पार पडत होत्या. काही धनदांडगे लोक या निवडणुकीत पैशाचे आमिष दाखवत ग्रामस्थांना मोहजाळात अडकून सिंहासनावर विराजमान होऊ लागले. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला तो पुन्हा मिळविण्यासाठी. सदस्यांना विश्वासात घेऊन अनेक गैरव्यवहार करण्यास सुरवात झाली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगू लागला. खेडोपाडी सरपंच पदाला चांगला मान मिळू लागला. नव्हे तर आर्थीक लाभही होत असल्याने सर्वसामान्य माणूस या पदासाठी जिवाच रानं करायला तयार झाला. गावागावात गटातटाचे राजकारण सुरु झाले.
हेही वाचा - नांदेड : लोहा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या -
अनुभवाच्या जोरावर पुढील दिशा
कधी कधी निवडणूकीचा वाद विकोपाला जाऊन अनेकांना जीव गमवावा लागतो. आज प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामिण भागातील विकासाची नाळ ही ग्रामपंचायतशी जोडल्या गेल्याने सरपंचपदाला महत्वप्राप्त झाले आहे. शासनानेही ग्रामपंचायतीत होणाऱ्या एकमुखी निर्णय बैठकीस अधिकार प्राप्त करुन दिले आहेत. पाच वर्षात आलेल्या अनुभवाच्या जोरावर पुढील दिशा ठरवीली जाणार आहे. गावागावात सध्या बैठाकावर बैठका सुरु झाल्या आहेत. पॅनलप्रमुख असलेल्या कारभाऱ्याला मात्र आतापासुनच खिशाला चाट बसत असून मतदारांची मनधरणी करावी लागत आहे.
मतदार कुणाचे?
तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जरी राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी मात्र प्रत्येक गावात राजकीय ‘टच’असतोच तसा अर्धापूर तालुका हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपचा बालेकिल्ला असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचे अधिक सरपंच असावेत यासाठी पडद्यामागे राहून ‘खो’देण्यासाठी येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना कामाला लावण्याची दाट शक्यता आहे. विरोधकही याच धर्तीवर त्यांची कामे आटोपून घेतील यात शंका नाही. येणाऱ्या काळात कोण अधिक जागा बळकावतील हे आतातरी स्पष्ट सांगता येत नाही.
संपादन - प्रल्हाद कांबळे