
नांदेड : बालिकेवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
नांदेड : १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर मध्यरात्री तिच्या घरात प्रवेश करून अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय युवकाला येथील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश, विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली आहे.
अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी १४ वर्षीय बालिका आपल्या भावासोबत घरात झोपली होती. आई-वडील घराबाहेर झोपले होते. मध्यरात्री त्यांच्या घराशेजारी राहणारा सुनिल प्रकाश गजभारे (वय २१) हा युवक बालिका झोपलेल्या खोलीवरील पत्रे बाजूला करून आत आला आणि त्या बालिकेवर अत्याचार केला. त्यावेळी तिने आरडा ओरड केला. तेंव्हा लहान भाऊ उठला आणि बाहेर जाऊन आई-वडीलांना घेवून आला. अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायदांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दोन आॅक्टोबर २०२० रोजी ही घटना घडली होती.
गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक विष्णुकांत गुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरिक्षक आर.टी.नांदगावकर यांनी केला. बालिकेवर अत्याचार करणारा सुनिल प्रकाश गजभारे यास अटक करून नांदगावकर यांनी त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात विशेष पोक्सो खटला सुरू झाला तेंव्हा त्यात बालिकेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉ.आर.डी.अवसरे यांच्यासह १० साक्षीदारांनी आपला जवाब न्यायालयासमक्ष नोंदविल्या.
उपलब्ध पुरावा आधारे अटकेपासून आजपर्यंत तुरूंगात असलेल्या सुनिल प्रकाश गजभारेला न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.सौ.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली. आरोपीच्यावतीने अॅड.पी.एन.शिंदे यांनी काम पाहिले. अर्धापूर पोलिस सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक व्ही.एम.पठाण यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.