Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat elections started

Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु

नांदेड : जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या ता. २८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, ता. १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी आपले गट मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

जिल्हा, राज्य पातळीवर राजकीय सोईसाठी हात मिळवणी करणारी नेते आता ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी भर देताना दिसत आहेत. त्यातूनच त्यांचा पुढे जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेसाठी मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे ही निवडणुक ग्रामपंचायतीची असली तरी झलक विधानसभेची असल्याचे बघायला मिळणार आहे.

युती सरकारच्या काळात थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. त्यात महाविकास आघाडीने मात्र तो रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांतूनच सरपंच निवडणून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुन्हा सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने थेट सरपंच निवडणूक जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात कॉँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. शिंदे समर्थक उमेदवार सर्व ठिकाणी मिळणे कठीण आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिळेल, परंतु महाविकास आघाडी असल्याने येथे राष्ट्रवादी आणि भाजपाचे वर्चस्व कायम आहे. विधानसभेची निवडणूक मध्यावधी लागली. विधानसभेचा कालावधी संपण्यास तर अडचण नको म्हणून विधानसभेसाठी इच्छुक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले आहे. गावातील कार्यकर्त्यांना पाठबळ दिले तरच ते पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणूकीत त्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे या नेत्यांकडून आपल्या गटाचे पॅनल तयार करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.

थंडीत राजकीय वातावरण तापले

पॅनल प्रमुख विश्वासू कार्यकर्ता राहील, याची काळजी घेतली जात आहे. राखीव प्रवर्गातून सक्षम उमेदवार शोधताना अनेकांना अडचणी येत आहेत. गावागावांतून पॅनल उभारणीसाठी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु आहेत. त्यामुळे ऐन थंडीच्या काळातही राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षाशिवाय स्थानिक आघाड्या, अपक्ष यांचा मोठा भरणा यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत बघायला मिळेल, असेही संकेत जाणकारांनी मांडले आहेत.

थेट निधीमुळे वाढले इच्छुक

आता शासनाच्या विविध योजना, वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो आहे. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या ऐवजी ग्रामपंचायतीवर निवडून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. विशेषतः सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. राजकीय पक्षापेक्षा गट - तट यामुळे या निवडणुका बहुरंगी असणार आहेत.