नांदेड : ग्रामसेवकाने केला साडेचार लाखाचा अपहार, चौकशीची मागणी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 1 October 2020

हदगाव तालुक्यातील नाव्हा ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा सहा लाख 64 हजार 35 रुपयांचा निधी ग्रामपंचायत खात्यावर ता.13 फेब्रुवारी 2020 रोजी जमा झाला होता.

नांदेड : हदगाव तालुक्यातील नाव्हा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या 14 व्या वित्त आयोग व ठक्कर बाप्पा योजनेचा सुमारे चार लाख 35 हजाराहून अधिक निधीचा परस्पर स्वतः च्या खात्यावर जमा करून ग्रामसेवकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी एका तक्रारीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी हदगाव यांच्याकडे महिला सरपंचांनी केली आहे.

हदगाव तालुक्यातील नाव्हा ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा सहा लाख 64 हजार 35 रुपयांचा निधी ग्रामपंचायत खात्यावर ता.13 फेब्रुवारी 2020 रोजी जमा झाला होता. तसेच आदिवासी वस्ती सुधार योजना अर्थात ठक्कर बाप्पा योजनेचा ग्रामपंचायत खात्यावर एक लाख 13 हजार रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होता. ग्रामसेवक एस. एस. सायागौड यांनी कोरोना लॉकडाऊनचा फायदा घेऊन ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार गावात कोणतेही विकास काम न करता महिला सरपंचाच्या खोट्या सह्या करून निधी परस्पर स्वतः च्या बँक खात्यात वळता करून घेऊन ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचानांदेड : एमएचटी- सीईटी परिक्षेला जाण्या- येण्यासाठी उमेदवारांसाठी बसेसची सोय

आणखी 70 हजार 700 रुपये देखील उचलले 

ग्रामसेवक श्री. सायागौड यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या निधी पैकी 25 फेब्रुवारी 2020 रोजी एक लाख 38 हजार 611 रुपये, सहा मार्च 2020 रोजी ५० हजार, ता.13 मार्च 2020 रोजी ५० हजार आणि ता.13 एप्रिल 2020 रोजी ३८ हजार रुपये असा एकूण तीन लाख 22 हजार 411 रुपये रक्कम आपल्या स्वतः च्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. तसेच जीएसटीची रक्कम ता. 3 डिसेंबर 2019 रोजी पन्नास हजार, आठ जानेवारी 2020 रोजी 14 हजार आणि 18 मे 2020 रोजी 49 हजार असा एक लाख 13 हजार रुपये उचलून घेतले. असा एकूण ग्रामपंचायत मधील दोन्ही योजनांचा सुमारे चार लाख 35 हजार रुपयांचा निधी उचलून आपल्या खात्यात जमा करून घेतल्याचा व ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. एवढेच नाही तर आणखी 70 हजार 700 रुपये देखील उचलले असून त्याचे विवरण मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

येथे क्लिक कराजिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

ग्रामसेवकाने निधीचा अपहार करून गावाची फसवणूक 

नाव्हा ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पाबाई ग्‍यानोबा मानिकदुर्गे यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन ग्रामसेवक यांनी कोरोना काळात ग्रामपंचायत निधीचा परस्पर अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने महिला सरपंचांनी मागील जुलै महिन्यात त्या ग्रामसेवकाविरुद्ध गट विकास अधिकारी हदगाव यांच्याकडे ग्रामसेवकाने निधीचा अपहार करून गावाची फसवणूक केली ग्रामसेवकांनी तात्काळ चौकशी करावी आणि कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु गटविकास अधिकारी यांनी कारवाई तर सोडाच पण साधी चौकशी देखील केली नाही. आता मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Gramsevak embezzles Rs 4.5 lakh, demands inquiry nanded news