
Nanded : कृषिपंपाच्या वीजजोडण्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा
नांदेड : महावितरणने गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत राज्यभरात ५४ हजार वीज जोडण्या दिल्या आहे. हा वेग आणखी वाढवून मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना विज जोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कृषीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या मार्च अखेरपर्यंत पुर्णत्वास न्याव्यात असे निर्देश महावितरणच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी नुकतेच दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कृषीपंपांच्या नवीन वीज जोडण्याबाबत मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता अनील डोये, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधच यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या नऊ हजार ८९० कृषीपंपधारकांना येणाऱ्या मार्च अखेरपर्यंत वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट असून, या कामांना अधिक वेग द्यावा, असेही आदेश दिले.
कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध कृषि आकस्मिक निधीच्या माध्यमातून आज अखेर दोन हजार ५९० वीजजोडण्या देण्यात आल्या असून नांदेड जिल्हयासाठी निर्धारीत लक्ष्य पुर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक विभागीय व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. त्याचबरोबर थकबाकीदार कृषिपंपधारकांचे वीजबील भरण्याबाबत समोपदेशन करून नीयमीत वीजबील भरण्यासाठी प्रवृत्त करावे अशाही सुचना केल्या. दरम्यान यापुढे कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचेही आदेश सुचित्रा गुजर यांनी दिले आहेत.