नांदेड : शहरातील गरजू व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप. गुरुजी व कमल फाऊंडेशनचा पुढाकार

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 6 January 2021

आज प्रत्येकाचा खर्च वाढला असुन, अनेकजण अनावश्यक गोष्टीवर अधिक खर्च करताना दिसून येतात. लग्न, वाढदिवस, नामकरण अशा कार्यक्रमात सर्रासपणे अनाश्यक पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र आजही समाजात वावरताना काही व्यक्ती समाज उपयोगी उपक्रम राबविताना दिसून येतात

नांदेड : समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मायेची ऊब देत नांदेड येथील सामाजिक संस्था गुरुजी व कमल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात गरजू व्यक्तींना दिव्यांगांच्या हस्ते मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

आज प्रत्येकाचा खर्च वाढला असुन, अनेकजण अनावश्यक गोष्टीवर अधिक खर्च करताना दिसून येतात. लग्न, वाढदिवस, नामकरण अशा कार्यक्रमात सर्रासपणे अनाश्यक पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र आजही समाजात वावरताना काही व्यक्ती समाज उपयोगी उपक्रम राबविताना दिसून येतात. ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजासाठी आपणालाही काही देणे आहे, या भावनेतून उदय नरवाडे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, नांदेड येथील सामाजिक संस्था गुरुजी व कमल फाऊंडेशन या संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते नांदेड येथील शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या उपेक्षित व गरजू व्यक्तींना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप केले.

श्री. नरवाडे यांनी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी गुरुजी फाउंडेशनचे यशपाल भोसले, उदय नरवाडे, अविनाश पाईकराव, कमल फाऊंडेशनचे राहुल साळवे, अमरदीप गोधने, आर्यन श्रीमंगले, घनश्याम जाधव, राजु ईराबत्तीन, कार्तिक भरतीपुरम आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Guruji and Kamal Foundation's initiative to distribute blankets to needy people in the city nanded news