esakal | नांदेड : पोलिस खिशात असल्याचा आव आणणाऱ्या गुटखा माफियांनी अनुभवली ‘वर्दीची ताकद’

बोलून बातमी शोधा

सिंदखेड पोलिस
नांदेड : पोलिस खिशात असल्याचा आव आणणाऱ्या गुटखा माफियांनी अनुभवली ‘वर्दीची ताकद’
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : सिंदखेड (ता. माहूर) पोलिस ठाणे हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी एका सराईत गुटखा व्यापाऱ्याच्या संशयित वाहनाची तपासणी केली. गाडीमध्ये गुटखा नसताना आमच्या वाहनाची तपासणी का केली. म्हणून पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गोंधळ घालून जाब विचारणाऱ्या सारखणी व परिसरातील दोन सराईत गुटखा तस्करांचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतल्याची चर्चा सोशल माध्यमावर व्हायरल झाली असून या घटनेला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांना (ता. १८) एप्रिल रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इद्रीस कादर छाटीया हा सराईत गुटखा तस्कर आपल्या ताब्यातील ( एम.एच.०४ सी.एम.४८६२) कारमध्ये गुटखा टाकून तस्करी करत आहे. या माहिती वरुन सिंदखेड पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहन अंजनखेड गावाजवळ थांबविले. सदर वाहनात असलम बानानी रा. सारखणी व इद्रीस छाटीया राहणार सिंदखेड हे दोघे दिसून आले. वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये स्टाईलस व फराळी चिवडा मिळून आले म्हणून वाहन सोडून देण्यात आले. व या घटनेची सविस्तर नोंद पोलिस ठाण्याच्या डायरीमध्ये क्रमांक ०५/२०२१ मध्ये करुन पोलिस कोविड संचार बंदीच्या दौऱ्यानिमित्त कर्तव्यावर रवाना झाले.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय बिरुदावलीचे साक्षात्कार...

यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास ‘त्या’दोन गुटखा व्यावसायिकांनी सिंदखेड पोलिस ठाणे गाठून कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार व कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांना दमदाटी करत आमच्या वाहनात गुटखा नसताना वाहनांची झडती घेतलीच कशी, आम्हाला निल पंचनाम्याची प्रत द्या, आदी प्रश्नांचा भडिमार करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोलिस ठाण्यामध्ये हजर सर्वच कर्मचाऱ्यांनी ‘त्या’दोन्ही सराईत गुटखा तस्करांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने घडत असलेल्या प्रकारचे घटनाक्रम सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांना कळविले. काही वेळातच तिडके यांनी पोलिस ठाणे गाठून परत ‘त्या’व्यापाऱ्यांची समजूत घातली परंतु गुटखा तस्कर पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण करुन अब्रुचे धिंडवडे काढणे काही केल्या थांबवत नसल्याने मग पोलिसांनी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय बिरुदावलीचे साक्षात्कार करण्यास सुरुवात केली. पोलिस प्रशासन आपल्या खिशात असल्याचा आव आणणाऱ्या सराईत गुटखा तस्करांची ऐथेच्छ धुलाई करुन ‘वर्दीची ताकत’काय असते याचे प्रत्यय घडवून आणले. पोलिस देत असलेल्या प्रसादामुळे काकुळतीला आलेल्या सारखणी व परिसरातील बाहुबली गुटखा तस्करांने पोलिसांसमोर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार करत पुन्हा अशा पद्धतीने पोलिस ठाण्यात गोंधळ घालणार नाही व सिंदखेड पोलिस ठाणे हद्दीत गुटख्याची तस्करीही करणार नाही. या अटीवर आपली सुटका करुन घेतली.

‘मार खाणाऱ्याने सांगायचं नाही, आणि मरणाऱ्याने वाच्यता करायची नाही....

एकंदरीत पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करुन उद्धट वर्तन करणाऱ्या माहूर आणि किनवट तालुक्यातील प्रख्यात गुटखा माफियांवर अखेर पोलिसांचे पाया पडून सुटका करुन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. शिवाय ‘मार खाणाऱ्याने सांगायचं नाही, आणि मारणाऱ्याने वाच्यता करायची नाही’ या अटीवर सदर प्रकरण ठाणे स्तरावरच निवळले. परंतु या घटनेची चर्चा मात्र सोशल मीडियासहित सर्वदूर पसरल्याने भविष्यात हे गुटखा तस्कर पोलिसांच्या नांदी पुन्हा लागणार नाही. अशी खमंग चर्चा सिंदखेड पोलिस ठाणे हद्दीतील वाई बाजार, सारखणी परिसरात चवीने चर्चिली जात आहे. सोबतच सिंदखेड पोलिसांनी गुटखा माफियांना विशेष ट्रीटमेंट देऊन गुंड प्रवृत्तीच्या ‘गुटखा पेडलर’प्रति दाखविलेल्या धाडसाचे कौतुक ही केले जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे