
नांदेड : हदगावचे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात
हदगाव : येथील बस स्थानकात कमालीची दुरावस्था झाली असून संपूर्ण परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांना चिखल तुडवत बसमध्ये चढ-उतार करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना चिखल पाण्यातून ये-जा करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन ही समस्या मार्गी लावावी अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे.
अगोदर आलेले कोरोनाचे संकट आणि त्यानंतर चालक-वाहकांच्या दिर्घकाळ चाललेल्या संपामुळे परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. असे असतांना देखभाल दुरुस्तीसाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध होणे दुरापास्त मानले जाते. तथापी बस सेवा पुर्व पदावर आली तरी अजुनही उत्पन्नात अपेक्षित प्रगती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान बस स्थानकाच्या समोर नालीचे बांधकाम सुरू असल्याने डेपोचे आत येणारे गेट बंद केले असल्याने बाहेर जाणाऱ्या गेटमधूनच बसेसची ये-जा सुरू आहे. परिणामी बसचालकांना बस बसस्थानकात नेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय प्रवाशांनाही डबक्यातून जाताना सावध भूमिका घ्यावी लागत आहे.
रस्त्याच्या कडेला होणारे नाली बांधकाम व रस्त्याचे नवीन काम यामुळे निश्चितच रस्त्याची उंची वाढणार आहे. परिणामी बस स्थानकातील जागेत पावसाचे पाणी साचण्यास मदतच होणार आहे. यासाठी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. हदगाव नगर परिषद प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी जन हितार्थ बस स्थानक परिसरात गिट्टी व त्यावर छुरी पसरवून साचलेले पाण्याचे डबके बुजवून प्रवासी नागरीकांना कायमस्वरुपी दिलासा देण्याची गरज आहे.
Web Title: Nanded Hadgaon Bus Stand Bad Condition Road Damage Due To Heavy Rain Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..