जबरी चोऱ्यांमध्ये होत आहे वाढ : Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : जबरी चोऱ्यांमध्ये होत आहे वाढ
जबरी चोऱ्यांमध्ये होत आहे वाढ

नांदेड : जबरी चोऱ्यांमध्ये होत आहे वाढ

नांदेड : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून आर्थिक व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे लोटमार, जबरी चोरी, घरफोडी आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परिणामी यामध्ये १८ ते २५ वयोगटातील युवक अडकत असून, ते इकडे कशासाठी वळले याचा तपास करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तसेच हाताला काम नसल्याने अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे बहुतांश उद्योग कमी मनुष्यबळावर चालवत आहे. याचा परिणाम गुन्हेगारीवर होत आहे. नांदेड शहरामध्ये जबरी चोरी, लुटमार, घरफोडी आदी गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, पोलिसांचा अंकुशच यावर राहिलेला नाही.

हेही वाचा: उद्दिष्टे येऊन पडली तरीही प्राधान्यक्रम याद्याच तयार नाहीत

त्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (ता.१९) विश्वकर्मा नंदीग्राम सोसायटीत राहणारा मुलगा विवेक लक्ष्मण कारले (वय १८) हा यशवंत महाविद्यालयाकडे पायी जात होता. दरम्यान वसंतनगर येथे रावसाहेब पाटील यांच्या घरासमोर दुचाकीवरून आलेल्या (एमएच-२६, बीएच-२५९२) अनोळखी तीन चोरट्यांनी (१८ ते २१ वयोगटातील) त्याला अडवले. शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी त्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या खिशातील १० हजार ५०० रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल जबरीने घेऊन चोरटे पळून गेले.

विवेक कारले याच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. रोडे तपास करत आहेत. आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश विद्यार्थी नांदेडमध्ये कोचिंगचे शिक्षण घेत आहेत. परंतु, नांदेडमधील गुन्हेगारी वाढत असल्याने या विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी अशा गुन्हेगारीची गांभीर्याने दखल घेऊन पावले उचलावीत, अशी मागणी आता पालकांमधून होत आहे.

loading image
go to top