
Nanded News: ऋतू बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
नांदेड : संक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका वाढतो. हवेतील बदलाचा परिणाम त्वचेसह केसांवरही होतो. मात्र, हृदयावर होणारा विपरीत परिणाम दिसत नाही. दोन दिवसांपासून शीतलहरी आल्या आहेत. पहाटेच्या गार वातावरणात दमा, सांधेदुखीसह सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या काळात हृदयावर वाढलेला दबाव अतिशय धोकादायक ठरतो. वातावरणातील बदलाने शरीराचे तापमान कमी - अधिक होत असते.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारठा आहे. थंडीमुळे सर्दी-खोकला, अंगदुखीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. नांदेडमध्ये प्रत्येक घराच्या साथीला सर्दी, खोकला आला आहे. तसेच विषम तापमानाचा त्वचेसह हृदयावरही विपरीत परिणाम होतो.
हिवाळ्यात छातीत जंतुसंसर्ग होणे, हृदय गती वाढणे आणि रक्तदाब वाढणे यांसारख्या परिस्थितीमुळे हृदय गती बिघडू शकते. कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा धोका असून, त्यातून रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले.
सर्वाधिक थंडीचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये यंदा पाहिजे तशी थंडी पडली नाही. गेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानही सातत्याने कमी-अधिक होत आहे. गुरुवारीही शहरातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभर बोचरे वारे व गारठा होता. ढगाळ वातावरणामुळे शहरात सकाळी धुक्याची चादर पसरली होती.
आल्हाददायक वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्याला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हुडहुडीमुळे चहाच्या स्टॉलवर सकाळपासून गर्दी दिसली. प्रादेशिक हवामान विभागाने या आठवड्यात पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविल्याने हुडहुडी वाढणार आहे.
थंड वाऱ्यांमुळे भरली हुडहुडी
उत्तर भारतातील डोंगररांगांवर सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु असली तरी शहरात मात्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सरासरी तापमानात वाढ होऊन हुडहुडी कमी झाली.
गुरुवारी (ता. पाच) सूर्यनारायणाचे दर्शन फार झाले नाही. बोचरी थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे उबदार कपडे, स्वेटर, कानटोपी घालूनच नागरिक घराबाहेर पडले. आगामी आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता असून, थंडी वाढणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान खात्याने दिले आहेत.
अवकाळीचे ‘ढग’ गडद
यावर्षी अस्मानी संकटांमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल झाले. कापसाचा उतारा कमी झाला तर अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीचा अक्षरशः खराटा व्हायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन हातातून गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या शेतात हरभरा, भाजीपाला आणि गव्हाची पेरणी केली आहे.
मात्र, दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतातील जोमात असलेले पीक हातचे जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.