
नांदेड : ‘हर घर जल उत्सव’ मोहिमेत सहभागी व्हावे
नांदेड - जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ‘हर घर जल उत्सव’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ता. १२ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या भागीदारीतून राबवली जात आहे.
या योजनेत १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या सूचनेनुसार विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे, गावात ‘हर घर जल उत्सव’ साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम राबवणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच उत्सवांमध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इत्यादी सर्व घटकांना सहभागी करून घेणे आदी उपक्रम राबवणे बाबत सूचना आहेत. हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक व्ही. आर. पाटील व कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले आहे.