नांदेड : अपहरण झालेल्या मुलाची सुटका, तामसा पोलिसांची कारवाई 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 15 October 2020

मात्र तामसा पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात गंगाखेड यथून पिडीत मुलाची सुटका केली.  यासोबतच अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली.

नांदेड : ऊसतोडीच्या मजुरीसाठी घेतलेले पैसे व्याजासह का परत करत नाही म्हणून ऊसतोड मुकदमाने एका ऊसतोड मजूराच्या मुलाचे अपहरण केले. यावेळी त्या मुलाला मारहाण करण्यात आली. मात्र तामसा पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात गंगाखेड यथून पिडीत मुलाची सुटका केली.  यासोबतच अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली.

हदगाव तालुक्यातील कांडली (खुर्द) येथील ऊस मजुरदार रामा हैबतकर (वय ४०) याने ऊसडोतीसाठी एका कारखान्याकडून तीस हजार रुपये उचल घेतली होती. या पैशाच्या परतफेडीच्या वेळी व्याजासह ७५ हजार रुपये झाले. हे पैसे देण्यासाठी त्याच्या हाताला काम नसल्याने वेळेत देऊ शकत नव्हता. अनेकवेळा ऊस मुकदमाने त्याला पैशाची मागणी केली. मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. शेवटी ऊस मुकदमाने आपल्या काही साथीदारासह जीप घेऊन कांडली येथे आला. 

तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा 

रामा हैबतकर यांना पैशाची मागणी करुन शिविगाळ करु लागले. यावेळी वडिलाला शिविगाळ करत असल्याने त्यांचा मुलगा चंद्रकांत (वय २०) हा पुढे आला. या युवकास ऊस तोडीचे घेतलेले पैसे व्याजासकट तुझा बाप का देत नाही म्हणून त्यालाही मारहाण केली. ऊसतोड मुकदमाने आणलेल्या जीपमधून चंद्रकांत या मुलाचे अपहरण केले. या प्रकरणाची तक्रार तामसा पोलिस ठाण्यात रामा हैबतकर यांनी दिली. यावरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत स्वत:  सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी तपास हाती घेतला.

हे आहेत पोलिस कोठतील आरोपी 

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी आपले सहकारी शिवाजी अडसूळ, गोंडसे यांच्यासह अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी एक पथक तयार करुन गंगाखेड गाठले. गुप्त माहितीवरुन ज्या ठिकाणी मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्या ठिकाणी सापळा लावून अपहरण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. पळवून नेलेल्या मुलाला अगोदर ताब्यात घेऊन धीर दिला. त्याला व तीन्ही अपहरण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन तामसा पोलिस ठाणे गाठले. ठिकाणी म्हणजेच गंगाखेड जिल्हा परभणी येथे धडक मारली माहितीवरून या पथकाने अपहृत मुलाची सुटका करून शेख गौस उर्फ अल्ताफ, सय्यद मौला उर्फ बबलु सय्यद अब्दुल आणि सय्यद चांद सय्यद अब्दुल तिघे रा. गौतमनगर, गंगाखेड (जिल्हा परभणी) या तीन आरोपींना अटक केली. गुरुवारी (ता. १५) हदगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना ता. १७ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Kidnapped boy released, Tamsa police action nanded news