Nanded : कामगार चळवळीमधूनच समाजाचे प्रश्न सुटतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh Kabde

Nanded : कामगार चळवळीमधूनच समाजाचे प्रश्न सुटतील

नांदेड : सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस गरीब गरीब होत आहे. मुठभर श्रीमंतांच्या धनात मोठी वाढ दिसून येत आहे. कामगार, कष्टकऱ्यांच्या श्रमातुनच श्रीमंतांचे वैभव निर्माण होते. कामगार, कष्टकऱ्यांनी स्वतःच्या कायदेशीर अधिकाराच्या लढाईसह सामाजिक प्रश्नांवरही आंदोलने केली पाहिजे. सामाजिक परिवर्तनात कामगार चळवळीचे मोठे योगदान आहे. त्यातुनच सामाजिक विषमता व समाजाचे प्रश्न सुटतील. कामगार चळवळी सशक्त झाल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सुटणार नाहीत, असा विश्वास माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या तेरावे राज्यस्तरीय अधिवेशन पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात झाले. या परिसराला दिवंगत कामगार नेते कॉ. अनंतराव नागापूरकर असे नाव देण्यात आले होते. उद्‍घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघटनेचे अध्यक्ष कारभारी उगले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हंसराज वैद्य, ॲड. वर्षा देशपांडे, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) चे राज्यसचिव श्याम काळे, उदय चौधरी, ॲड. सुधीर टोकेकर, भारती न्यालपेली आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोप करताना उगले यांनी राज्य आणि देशातल्या विडी कामगार चळवळीचा आढावा घेतला. विडी कामगारांना देशपातळीवर एकच किमान वेतन लागू करावे. कामगारांनी स्वतःच्या न्याय-हक्कांसोबतच सामाजिक विषमतेच्या होणाऱ्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे सांगून कामगारांनी राजकीय भूमिका घेतल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. आयटकचे राज्य सचिव काळे यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा समाचार घेवून येणाऱ्या २०२४ मध्ये कामगार, कष्टकऱ्यांनी कुठल्याही भुलथापांना बळी न पडता सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहन केले.

ॲड. देशपांडे यांनी कामगार कायद्यात होणारे बदल मालक धार्जिने असून याविरुध्द सर्वच क्षेत्रातील कामगारांनी शेतकर्‍यांसारखे पेटून उठण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक ॲड. प्रदीप नागापूरकर यांनी केले तर सुत्रसंचालन के. के. जांबकर यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी यादगिरी श्रीराम, गणेश संदुपटला, गुरू पुट्टा, पद्मा तुम्मा, शारदा गुरुपवार, कलावती कोंडपाक, अख्तर, जब्बारखान पठाण, शिवाजी फुलवळे, देवराव नारे, दत्ता काळेवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Nanded Labor Movement Solve Citizen Problems Venkatesh Kabde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..