Nanded : पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer kharif crops loss

Nanded : पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात

कुरुळा : कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण, वन्य प्राण्यांचा हैदोस या ना त्या कारणांमुळे कुरुळा मंडळातील बळीराजाला संकटाचा सामना करावा लागतो. साधारण शेतजमिनी आणि संरक्षित पाण्याचा अभाव यामुळे पावसाळ्यात नियमित पाऊस झाला तरच सुखाचे दोन घास मुखात जातील अशी परिस्थिती. खरीपावर मदार आणि जगण्याला आधार असल्यामुळे कुरुळा मंडळात पाऊस दीर्घ रजेवर गेला आहे. या मुळे सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांसह इतर पिके धोक्यात आली आहेत.

कुरुळा महसूल मंडळात यंदाच्या हंगामात एकूण लागवडीलायक क्षेत्रापैकी ३८.६२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन तर ३८.९१ टक्के क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मृग नक्षत्रात अत्यल्प पाऊस झाला तर आर्द्रा नक्षत्रात जोराचा पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोवळ्या पिकांची वाढ खुंटली असून पिके पिवळी पडली आहेत. सखल आणि ओहोळगतच्या भागात अतिवृष्टीमुळे जमिनी खरडल्या आहेत. कंधार तालुक्याचा विचार करता कुरुळा महसूल मंडळात ६५१ मीमी पावसाची नोंद झाली. परंतु (ता.पाच) ऑगस्ट पासून पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने उभी पिके सुकत आहेत.

सोयाबीन पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून कापसाला फळधारणा होत आहे. या अवस्थेतच पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास जेमतेम उत्पन्न हाती येणाची शक्यता असते परंतु पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे अतिवृष्टीतुन वाचलेली पिके आता पावसाअभावी करपताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन पिकांवर कीड आणि अळीचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी द्विधा मनस्थितीत महागडी औषधी फवारणी करताना दिसत आहेत.

नुकतेच आम्ही कंधार तहसीलदार यांच्याकडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी अशी मागणी केली आहे. सद्या कुरुळ्यासह परिसरातील सोयाबीन, कापूस व इतर पिके पावसाअभावी आणि उन्हाच्या चटक्याने होरपळत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे.

- बाळासाहेब गोमारे.

Web Title: Nanded Lack Of Rain Kurula Farmer Kharif Crops Loss Agriculture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..