नांदेड : महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला लागली घरघर

विठ्ठल लिंगपूजे
Wednesday, 30 December 2020

ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटवून गावकऱ्यांचा पैसा, वेळ वाचवण्यासाठी तत्कालीन माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली

शिवणी  (ता. किनवट, जिल्हा नांदेड) : राज्यातील गाव, खेड्यातील लहान- मोठे तंटे गावातच मिटवून गाव पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र या योजनेला घरघर लागलेली पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटवून गावकऱ्यांचा पैसा, वेळ वाचवण्यासाठी तत्कालीन माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला या नवसंजीवनी मिळविण्याची प्रतीक्षा होती पण तसे न होता गाव खेड्यापासून दूर लोटली गेली. या समितीची घडी नीट बसत असतानाच मध्यंतरी या गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय खेचाखेची अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. विशेष म्हणजे या महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे या मरगळलेल्या योजनेला पुन्हा ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. परिणामी निधीचा वानवा, मार्गदर्शनाचा अभाव व राजकारणाचा शिरकाव यामुळे ही योजना विसर्जन होते की काय असे वाटायला लागले.

हेही वाचा - हिंगोलीच्या सनी पंडितची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

मागील दहा वर्षाच्या काळात या योजनेची कार्यक्षमता वाढविण्यात आले नाही. व योजने अंतर्गत देणारे पुरस्कार रखडले आहेत. मागील काळात या योजनेअंतर्गत मिळालेल्या पुरस्कारातून गावात विकास कामे ही करण्यात आली आहेत. गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी ही योजना अत्यंत परिणामकारक होती. तंटामुक्त गाव पुरस्कार मिळविण्यासाठी गावागावात चढा- ओढ पाहावयास मिळत होती. गावपातळीवर सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भुमिका तंटामुक्त गाव या योजनेमुळे पाहावयास मिळत होती. पोलिस ठाण्यात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पोलिसांचा भारही काही प्रमाणात कमी झाला होता. या योजनेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे भांडण- तंटेही वाढली आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The Mahatma Gandhi Dispute Free Village Scheme has started nanded news