नांदेडमध्ये लॉकडाऊननंतर प्रथमच होणार लाखोंची उलाढाल 

प्रमोद चौधरी
Friday, 6 November 2020

दोन महिन्यात सर्व व्यवहार हळुहळू पूर्वपदावर आले आहेत. सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत सणांची रेलचेल आहे. अवघ्या आठ दिवसांवर दिवाळीसारखा मोठा सण येवून ठेपला आहे. 

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाउननंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची उलाढाल होणार आहे. विविध कंपन्या व व्यापारी डिस्काऊंटच्या योजना (फंडा) जाहीर करत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधल्या जात असून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सात महिन्यांपासून संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली होती. सप्टेंबर महिन्यापासून अर्थव्यवस्थेला उभारी आली आहे. आर्थिक क्षेत्रातील ताज्या माहितीनुसार जीएसटीचे उत्पन्न वाढले आहे. गेल्या दोन महिन्यात सर्व व्यवहार हळुहळू पूर्वपदावर आले आहेत. सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत सणांची रेलचेल आहे. अवघ्या आठ दिवसांवर दिवाळीसारखा मोठा सण येवून ठेपला आहे. 

हेही वाचा - लेकीचे कुंकू पुसणाऱ्या तलाठी बापास अटक- पोलिस अधीक्षक राकेश कलासागर

लाॅकडाउननंतर प्रथमच दसरा सणाच्यावेळी ग्राहक वाढल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते. दसऱ्यानंतर काही दिवस बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, आता एक नोव्हेंबरपासून ते दिवाळी पाडवा म्हणजेच १६ नोव्हेंबरपर्यंत बाजारत लाखोंची उलाढाल होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने दिवाळीपूर्वी एलटीए व बोनस जाहीर केला आहे. हा बोनस केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच हातात पडणार आहे. 

हे देखील वाचले पाहिजे - पाचशे परिचारिकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड , २० पैकी १४ शासकीय कोविड सेंटर बंद, जेवणही दिले जात नसल्याची तक्रार

या सर्व पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांनी आणि गृहनिर्माण संस्था, व्यापाऱ्यांनी डिस्काऊंट योजना (फंडा) जाहीर केलेल्या आहेत.  ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम सोशल मिडिया, इंटरनेटच्या माध्यमातून, हस्तपत्रके व प्रसार माध्यमातून जाहीर होत असून याकडे चाणाक्ष ग्राहकांचे सतत लक्ष आहे. 

येथे क्लिक कराच - नादेड : आसना पुलावरून महामार्ग पोलिसांचे थेट सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच पत्र

रेडिमेड कपड्यांना प्राधान्य
यावर्षीच्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नूतन घर, फ्लॅट, प्लाॅट, दुचाकी, चारचाकी तसेच गृहोपयोगी वस्तू, फ्रीज, वॉशिंगमशीन, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅब यासह इलेक्ट्रॅनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी आतापासूनच पारख करण्यास सुरुवात केली आहे. घराघरात या दिवाळीला नवीन खरेदी करण्याच्या योजना कुटुंबातील सदस्यांमधून आखल्या जात आहेत. ग्राहकांचे लक्ष रेडीमेड कपड्यांकडे आहे. त्यामुळे कापड बाजारामध्येही दहा टक्के, २० टक्के तर काही ठिकाणी ३० टक्क्यांची सुट जाहीर केलेली आहे. 

लॉकडाउननंतर प्रथमच चैतन्य
दिवाळी सणाला आता आठच दिवस उरले आहेत. बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत असून, लॉकडाउननंतर प्रथमच दिवाळीचा सण साजरा होत असल्याने या काळात लाखोंची आर्थिक उलाढाल बाजारपेठेत होण्याचे संकेत आहे. 
- हनुमान मणियार (व्यापारी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Market Ready For Diwali Festival Nanded News