नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या 

प्रल्हाद हिवराळे
Saturday, 10 October 2020

 
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ढोलउमरी येथील विवाहिता अनिता बोईनवाड (वय २७) हिला लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर घरबांधकाम करण्यासाठी माहेराहून एक लाखाची मागणी पतीने सुरु केली.

उमरी (जिल्हा नांदेड) : सततच्या सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना ढोलउमरी (ता. उमरी ) येथे ता. सात आॅक्टोंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या अन्य मंडळीवर आत्महत्येस परावृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ढोलउमरी येथील विवाहिता अनिता बोईनवाड (वय २७) हिला लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर घरबांधकाम करण्यासाठी माहेराहून एक लाखाची मागणी पतीने सुरु केली. यातूनच तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. एवढेच नाही तर तिचा पती, सासू, सासरा व ननंद यांनी संगनमत करुन तु काळी आहेस, तुला स्वयंपाक जमत नाही म्हणून त्रास देणे सुरुच ठेवले. 

हेही वाचा -  नांदेड वनविभाग : निबंध, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांची जंगलस्वारी

पन्नास हजार व म्हैस देऊनही त्रास सुरुच होता

सासरी होणारा त्रास अनिता हीने आपल्या माहेरी सांगितला होता. परंतु माहेरची आर्थीक परिस्थिती बेताची असल्याने एवढी रक्कम कुठुन आणायची म्हणून ती सासरी त्रास सहन करत होती. बहिणीचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने तिचा भाऊ किशन गोपीनाथ यांनी ५० हजार रुपये व एक म्हैस दिली. त्यानंतरही बहिणीचा छळ काही थांबता थांबेना. ता. सात ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री सासरा बळीराम बोईनवाड, सासू गोदावरी बोईनवाड, नंदन शकुंतला व पती नरसिंग बोईनवाड यांनी मारहाण केली. याचा राग मनात धरुन अनिताने त्याच रात्री आपल्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

येथे क्लिक करासार्वजनिक ग्रंथालय चालकांच्या अडचणीत वाढ -

उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

घटनेची माहिती मिळताच माहेरची मंडळी धाऊन आली. यानंतर मयत अनिता हिच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर किशन गोपीनाथ बोईनवाड यांनी उमरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी पती, सासरा, सासू व ननंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मयत अनिता हिस तीन अपत्य असून दोन मुली (वय पाच व तीन) व सहा महिन्याचा मुलगा असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उमरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दताञय निकम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Married woman commits suicide after getting fed up with her father-in-law's troubles nanded news