नांदेड : वानराचा सहा जणांवर तर अस्वलाचा एका शेतकऱ्यावर हल्ला

प्रल्हाद कांबळे
Monday, 31 August 2020

अखेर या पिसाळलेल्या वानराने अनेकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यात एका शेतकऱ्यावर जंगली अस्वलाने हल्ला चढविला.

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील उमरी शिवारामध्ये पिसाळलेल्या वानराने मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. याबाबतची तक्रार वनविभागाकडे देण्यात आली होती. मात्र त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. अखेर या पिसाळलेल्या वानराने अनेकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यात एका शेतकऱ्यावर जंगली अस्वलाने हल्ला चढविला. या दोन्ही घटनामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. 

अर्धापूर तालुक्यातील उमरी शिवारामध्ये गेल्या काही दिवसापासून वानराने धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वानराने चावा घेतल्याने उमरी परिसरातील सरस्वती कीर्तनकार, मल्लीकर्जून गवळी, भागनबाई गवळी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. त्यांच्यावर खासगी व एका महिलेवर शासकिय रुग्णालय अर्धापूर येथे उपचार सुरू आहे. वन विभागाने वेळीच या गावठी वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा -  ‘या’ ठिकाणी कोरोनामुक्तीसाठी संकटमोचन महाआरती

वानराचा बंदोबस्त करावा

सध्या शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेल्या पिकांचा हंगाम सुरु आहे. त्यासाठी त्यांना आपल्या शेतावर जावे लागत आहे. मात्र परिसरात पिसाळलेल्या वानरांच्या भितीने अनेकजण शेताकडे फिरकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उमरी शिवारामध्ये पिसाळलेल्या वानराने हैदोस घातला आहे. त्याने अनेकांना चावा घेतला असून वन विभागाने तात्काळ त्या पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
- शहानंद मुधळ, सरपंच, उमरी, ता. अर्धापूर
 
तर दुसऱ्‍या घटनेत किनवट तालुक्यातील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले आहे. शेतात गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याच्या अंगावर अस्वलाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना रविवारी (ता. ३०)ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गणेशपुर शिवारात घडली. गणेशपुर कवठाळा शिवारात दत्ता भोयर यांचे शेत असून ते शेतात गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने अस्वलाच्या तावडीतून त्याची सुटका झाली.

येथे क्लिक करानांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू
 
वनविभागाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांध्ये भितीचे वातावरण

शेजारच्‍या शेतकऱ्यांने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना गोकुंदा (ता. किनवट) उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. श्री. बोडके यांनी त्यांच्यावर उपचार केले. या घटनेने पुन्हा एकदा किनवट परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात यापूर्वीही जंगली अस्वलाने अनेक शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वन विभागाकडून या अस्वलांचा व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A monkey attacked six people and a bear attacked a farmer nanded news