
Nanded : नांदेड महापालिकेतर्फे कर वसुलीसाठी कारवाई
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराची वसुली आणि थकबाकीची वसुली करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १५) पथकाद्वारे एका मालमत्ता धारकांचे नळ व ड्रेनेज बंद करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त पंजाब खानसोळे यांच्या सूचनेनुसार अशोकनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग आणि त्यांच्या वसुली पथकाने कार्यवाही केली. एका मालमत्ताधारकांकडून मालमत्ता व पाणी करापोटी ५० हजार रुपये कर थकीत होता.
मात्र, त्यांनी कर भरणा करण्यास नकार दिल्याने मालमत्ताधारकाचे नळ बंद व ड्रेनेज बंद करण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये कर्मचारी रणजीत पाटील, वसंत कल्याणकर, परसराम गाडे, जगदीश जयस्वाल, अमृत भस्के, शेषेराव शिंदे आदींनी सहभाग नोंदविला. मालमत्ताधारकांनी आपला थकीत व चालू कर भरणा वेळेवर करून महापालिकेस सहकार्य करावे आणि अप्रिय घटना टाळाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे.