आता महिलांना मिळणार 'ऑटोरिक्षा' चालविण्याचे मोफत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded women autorickshaw driving training free

आता महिलांना मिळणार 'ऑटोरिक्षा' चालविण्याचे मोफत प्रशिक्षण

नांदेड : शहरात महिला सक्षमीकरण, सुरक्षा व गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महिलांना ऑटोरिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण महिला बालकल्याण समितीमार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत.

नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षांची संख्या आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऑटोरिक्षा हे उपजीविकेचे चांगले साधन ठरत आहे. त्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याचे चित्र आहे. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऑटोरिक्षा, टॅक्सी चालवताना महिला दिसतात, परंतु मराठवाड्यात ऑटोरिक्षा चालवणारे महिलांचे दुर्मिळ चित्र आहे.

शहरातील ऑटोरिक्षातून अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता महिला ऑटोरिक्षा चालक असेल तर महिला प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येईल. दरम्यान नांदेड-वाघाळा महापालिकेतील स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून महिलांना आत्मनिर्भर करण्यासोबतच सुरक्षेच्या अनुषंगाने महिलांना ऑटोरिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे प्रशिक्षण लांबले होते. या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. महापालिकेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना अधिक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न असेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लायसन्स दिले जाईल असे सभापती किशोर स्वामी यांनी सांगितले. दरम्यान इच्छुक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर व उपमहापौर यांनी केली आहे. या प्रशिक्षणासाठी किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपाच्या वतीने या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांची सुरक्षितता आणि त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगत महापौर जयश्री पावडे यांनी समितीची कौतुक केले.

अर्ज आल्यानंतर पुढील प्रक्रिया

शिक्षण महिला व बालकल्याण समितीतर्फे गरजू महिलांना ऑटोरिक्षा प्रशिक्षण घेतले जाणार आहे. सध्या ता.२० मे पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यात किती महिलांना प्रशिक्षण द्यावे यासह अनेक बाबी अर्ज आल्यानंतर पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल. हे प्रशिक्षण मोफत असेल असे शिक्षण महिला बालकल्याण समितीच्या सभापती अर्पणा नेरलकर यांनी सांगितले.

Web Title: Nanded Municipal Corporation Activity Women Autorickshaw Driving Training Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top