नांदेड- नागपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा, खड्डे आणि महामार्ग पोलिसांचा जाच

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांना शिष्टमंडळ भेटणार, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना लक्ष देण्यासाठी वेळच नाही, चुरी व खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ, वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

नांदेड : राज्यातील काही महत्वाच्या रस्त्यांचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. मात्र हे काम कंत्राटदार आपल्या मर्जीनुसार कासवगतीने करत आहेत. यावर्षी झालेल्या जबरदस्त पावसाने नांदेड- नागपूर व्हाया अर्धापूर, वारंगा या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. मात्र अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत कंत्राटदारांना खड्डे बुजविण्यासाठी वेळ नसल्याने लवकरच या भागातील काही लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

नांदेड- अर्धापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आसना ब्रिज ते अर्धापूर रस्त्यावर खड्डेचखड्डे पडल्याने वाहन चालकांना खबरदारी घेऊन वाहन चालवावे लागत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच रस्ता उखडल्याने रस्त्यावरील चुरी व धुळीमुळे समोरचे काही दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचानांदेड : परतीच्या पावसामुळे रानमेवा असलेले सिताफळ बेचव -

चुरी व खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ 

राष्ट्रीय महामार्गच्या अधिका-यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच शिष्टमंडळ भेटून खड्डे व धूळमुक्त रस्ता करावा अशी मागणी करणार असल्याची माहिती आहे. 
नांदेड- नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव ते अर्धापूर- वारंगा दरम्यान मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामध्ये माती टाकून खड्डे पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडल्याने त्याचे चुरीमध्ये रूपांतर झाले. व त्या रस्त्यावरून लहान- मोठे वाहन गेल्याने चुरी व खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ होत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना  किंवा लहान वाहनांना कसरत करत आपले वाहन चालवावे लागत आहेत. 

येथे क्लिक करा शौर्यदिन : जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार

महामार्ग पोलिसांचा ससेमिरा वाहनधारकांच्या मागे 

या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने वाहन चालवतांना अनेकवेळा अपघात घडल्याच्या नोंदी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यातच महामार्ग पोलिसांचा ससेमिरा वाहनधारकांच्या मागे असल्याने अपघाताची मालिका सुरु आहे. वाहनधारकांना महामार्ग पोलिस आणि रस्त्यातील खड्डा यांचा सामना करत आपला प्रवास करावा लागत आहे. या बाबीकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लक्ष घालावे अशी मागणीवाहनधारकांतून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded-Nagpur road became a death trap, and highway police tourture nanded news