नांदेडला आता ६३ जणांची चाचणी...अहवालाची प्रतीक्षा....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

शुक्रवारी सकाळी अबचलनगर येथील ३६ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरूष यांच्यासह रवीनगर कौठा परिसरातील एका ३५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८ वर पोहचली आहे. 

नांदेड - नांदेड महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या रवीनगर (कौठा) व एनआरआय यात्री निवास परिसरातील ६३ संशयितांचे शुक्रवारी (ता.आठ) ‘स्वॅब’ तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्या सर्वांचे अहवाल प्रलंबित असून, उद्या सकाळपर्यंत त्यांचे स्वॅब नमुने अहवाल येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

२३ चालकांच्या निकटवर्तीयांचे ‘स्वॅब’ व इतर अशा ६३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरुवारी (ता.सात) संध्याकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते. शुक्रवारी (ता.आठ) मध्यरात्री ६३ पैकी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी २० जणांचा अहवाल निगेटिव्ह तर तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी नव्याने तिन कोरोनाबाधीत रुग्ण म्हणून भर पडल्याने शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ वर पोहचली आहे. 

हेही वाचा -  नांदेड ब्रेकिंग : आज तीन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ३८

कोरोना बाधीतांची संख्या वाढली-

लॉकडाउनमध्ये नांदेडात अडकुन पडलेल्या पंजाब येथील यात्रेकरुस सोडण्यासाठी गेलेल्या २३ वाहन चालक शहरात परतल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. तेव्हा २३ पैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुद्वारा परीसरातील ९७ सेवादारांचे ‘स्वॅब’ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात एक दोन नव्हे तर, एकाच वेळी २० जणास ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. मात्र ‘स्वॅब’ घेऊन सोडुन दिल्यामुळे ९७ पैकी विशेषता कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी एकही रुग्ण जागेवर सापडत नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरुन गेले होते. 

हेही वाचा- जर्मनीतील म्युनिक शहरात ‘डिजिटल’ महाराष्ट्र दिन

पहिला निगेटिव्ह दुसरा अहवाल पॉझिटिव्ह

त्या २० कोरोना बाधीतांचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुद्वारा परिसरात छापे मारी करुन १५ कोरोना बाधीतास शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांचे यापूर्वी पहिली स्वॅब चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र त्यांची दुसरी चाचणी घेण्यात आली तेव्हा मात्र तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन चांगलेच बुचकळ्यात पडले आहे.

 चार कोरोना बाधीत रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

शुक्रवारी (ता. आठ) सायंकाळी पाच पर्यंत आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यातील ९३ हजार ६२३ नागरीकांची आरोग्य तपासणी करुन त्यातील एक हजार ५०२ संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले त्या पैकी एक हजार ३७६ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ६३ जणांचा अहवाल अजूनही प्रलंबितच आहे. आत्तापर्यंत घेतलेल्या अहवालापैकी ३८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सहा रुग्ण विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २५ कोरोना बाधीतावर उपचार सुरु आहेत. तर चार कोरोना बाधीत रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Is Now Awaiting The Test Report Of 63 People Nanded News