नांदेड : बदल्यांचे ‘सेटिंग’ फिस्कटले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transfer

नांदेड : बदल्यांचे ‘सेटिंग’ फिस्कटले...

नांदेड - राज्यातील सत्ता अचानक बदलल्याने बदल्यांसाठी अधिकाऱ्यांनी लाऊन ठेवलेले अर्थपूर्ण सेटिंगसुद्धा बदलली आहे. त्यामुळे अनेकांना घाम फुटला आहे तर दुसरीकडे बदल्या थांबल्याने अनेकांना गुदगुल्या होत आहेत.

सत्ता बदलल्याने सर्वाधिक परिणाम प्रशासनावर होणार असल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळाचे गठण होताच अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. या बदल्यावर नवीन सरकारची छाप असणार असेल. ता. ३१ मेपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ता. ३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे बदल्यांसाठी होत असलेल्या घोडेबाजाराच्या आरोपावरूनच महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याला मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यामुळेच बदल्यांना महिन्याभराची स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती. तर एका मंत्र्यानेही यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची चर्चा आहे.

बदल्यासाठी अनेकांनी सेटींग केली होती. सोयीचे ठिकाण मिळण्यासाठी काहींनी मंत्रालय गाठले, काहींनी मंत्रालयात प्रवेश असलेले पक्षातील कार्यकर्ते तर काहींनी ओळखीच्या माध्यमातून मंत्री, सचिवांची भेटीगाठी घेतल्या. त्यांच्यापर्यंत मॅसेज पोहोचविला. त्यासाठी आवश्यक तडजोड करण्याची तयारी दर्शविली. काहींनी पहिल्या टप्प्यातील तडजोडीही पू्र्ण केल्याचे समजते. अधिक वजन असलेल्यांना प्राधान्य मिळणार होते. परंतु यामुळे त्याच जागेवर डोळा ठेऊन असलेल्यांचा हिरमोड झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बदलीस स्थगिती दिल्याने काहींची धाकधुक वाढली होती. बदल्यांवरील स्थगिती उठण्यापूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि सत्ताबदल झाली.

पूर्वीच्या सरकारकडून करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्याचे स्पष्ट संकेत नवीन एकनाथ शिंदे सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची सेटींग बिघडल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. केलेली तडजोडही वाया गेल्याने अनेकांना घाम फुटला आहे. तर ज्यांनी तडजोड केली नाही, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आहे.

Web Title: Nanded Officer Job Transfer Government Change Transfers Stopped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..