नांदेड : एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. धर्माबाद तालुक्यातील घटना

 सुरेश घाळे
Monday, 23 November 2020

दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२२) रोजी आत्महत्या केलेल्या युवकाचे प्रेत दुपारी आढळून आले. तालुक्यातील बेल्लूर (बु) गावजवळच असलेल्या तेलंगणातील कंदाकुर्ती येथील युवक प्रवीण विठ्ठल खंदारे (वय २०) हा हैद्राबाद येथे कंपनीत काम करत होता.

धर्माबाद (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील बेल्लूर (बु)  कंदाकुर्ती गोदावरी नदी पुलावरून एका युवकाने बेकारीला कंटाळून आत्महत्या केली. तर थोडया वेळातच पुलावरून वाकून पाहत असताना अचानक तोल गेल्याने दुसऱ्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना एकाच दिवशी शनिवारी (ता. २१) रोजी सकाळी घडल्या.

दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२२) रोजी आत्महत्या केलेल्या युवकाचे प्रेत दुपारी आढळून आले. तालुक्यातील बेल्लूर (बु) गावजवळच असलेल्या तेलंगणातील कंदाकुर्ती येथील युवक प्रवीण विठ्ठल खंदारे (वय २०) हा हैद्राबाद येथे कंपनीत काम करत होता. तो लॉकडाऊनमध्ये गावी आला होता. गावात काम मिळत नाही, कुठे जॉब लागत नसल्याने अखेर बेकारीला कंटाळून प्रवीण खंदारे यांनी बेल्लूर - कंदाकुर्ती गोदावरी नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेत दुसऱ्या दिवशी मिळाले असून शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा तपास कंदाकुर्ती पोलिस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा हिंगोली : खून झालेल्या युवकाच्या पत्नीचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ

दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू 

याच दिवशी तालुक्यातील समराळा येथील रहिवासी परशराम भीमराव जाधव (वय ३५) हे कंदाकुर्ती येथील पाहुण्यांकडे आले होते. कंदाकुर्ती येथील मुलगा नदीत पडला असे ऐकण्यात आल्याने परशराम जाधव हे गोदावरी नदीवर येऊन वाकून पाहत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने नदीत पडून मृत्यू झाला असे धर्माबाद पोलिस सूत्रांनी सांगितले. यांचेही प्रेत दुसऱ्या दिवशी दुपारी तीन नंतर मिळाले. परशराम जाधव यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, तीन बहीणी, पत्नी, चार मुले असा परिवार आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: One committed suicide and the other drowned due to loss of balance. Incidents in Dharmabad taluka nanded news