Nanded : ‘ऑनलाइन गेमिंग’चे युवा वर्गात व्यसन Nanded Online Gaming Youth Category children | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online games

Nanded : ‘ऑनलाइन गेमिंग’चे युवा वर्गात व्यसन

नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्ट फोन लहान वयात मुलांच्या हातात पडला. ज्या ऑनलाइन शिक्षणासाठी पाल्यांनी मोबाईल घेऊन दिला, त्या मोबाइलवर शिक्षण कमी आणि गेम्स जास्त हा प्रकार व्यसन बनला आहे. परिणामी आजच्या तरुण पिढीला मोबाइलचे व्यसन जडले आणि आता त्यासोबतच ऑनलाइन जुगार गेम्सची त्यांना सवय झाली आहे.

मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळणे ही सवय आता व्यसनामध्ये परिवर्तीत होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. काही पुरुषार्थ न करता केवळ गेम्सच्या नावाखाली ऑनलाइन जुगार खेळत आहेत. त्यामुळे समाजात अनेक तरुण या प्रलोभनाचे आहारी गेले आहेत. कोरोना काळापासून मोबाईल व इंटरनेटसह विविध इलेक्ट्राॅनिक गॅझेटचा वापर शहर आणि ग्रामीण भागात वाढला आहे.

ही उपकरणे सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतात. मात्र, कोरोना गेल्यानंतरही शालेय आणि महाविद्यालयीन मुले अभ्यास सोडून तासनतास गेम खेळण्यात दंग असल्याने पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. वैद्यकीय भाषेत इंटरनेट अॅडिक्शन डिसआॅर्डर आणि इलेक्ट्राॅनिक फोबिया ही नव्याने समोर येऊ लागलेली समस्या आहे.

वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान

सोशल मीडिया, ऑनलाइन गेमींगचे व्यसन दूर करणे वैद्यकीय क्षेत्रासाठी नवे आव्हान आहे. इंटरनेट व मोबाईलचा वापर हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने गॅझेट्सचे आॅडिक्शन अधिक धोकादायक ठरत आहे. यात शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने, मार्गदर्शन केंद्राची गरज वाढली आहे.

नवीन तंत्रज्ञानविषयक जागरुक राहणे आवश्यक आहे. त्यामध्ये डीजिटल वेल बिईंगची योग्यरित्या मदत होते. प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये वेल बिईंगची सुविधा उपलब्ध असते. हे ऑनलाइन आपण किती वेळ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहोत, याचा हिशेब ठेवते. शासनाने या ऑनलाइन जुगारावर बंदी घालून किंवा मोबाइलमधील सर्व गेम्सचे पबंद करून युवा पिढीला यातून बाहेर काढावे, असा सूर आता पालकांमधून होतो आहे.

मोबाईलचा अती वापर ऐन तारुण्यात म्हणजे अवघ्या २० ते ३० वयोगटात हार्टअटॅक येण्याचे प्रमाण वाढत असून, ही चिंताजनक बाब आहे. आळस युक्त जीवनशैली, वाढता तणाव, तासनतास स्क्रीन टाईम हे हृदयाचे आजार वाढवत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलून गेली आहे. अवेळी झोपणे, जेवणाचे योग्य नियोजन नसणे, अनियंत्रित खानपान, व्यायामाचा अभाव आदींमुळे तणाव वाढतो आहे.

- डॉ. सुहास काटे, योगतज्ज्ञ.

मोबालचा वाढता वापर तरुण वर्गात नैराश्याला आमंत्रण देत आहे. त्यामुळे जीवनाचा दृष्टीकोन बदलून तणाव पूर्ण जीवनशैली, आजार, क्रोध, जीवनाचे प्रबंधन करण्यासाठी असफल ठरणे इत्यादी समस्या तरुण वर्गात वाढत आहेत.

- आत्माराम नेमाडे, सेवानिवृत्त शिक्षक.