Nanded : पालकांचे कुलूपबंद आंदोलन यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded parents movement successful

Nanded : पालकांचे कुलूपबंद आंदोलन यशस्वी

मरखेल : जिल्ह्यात नावाजलेल्या शाळांपैकी एक असलेल्या मरखेलच्या जिल्हा परिषद शाळेमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, या मागणीसाठी नागरीकांनी गुरुवारी (ता. १५) पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. आंदोलनाची तत्काळ दखल घेत या शाळेस गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर मरखेलच्या शाळेत दाखल होत चार शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उघड्यावर भरलेली विद्यार्थ्यांची शाळा दोनच तासात पूर्ववत सुरू झाली असून, शिक्षण विभागाने दिलेल्या आश्वासनामुळे पालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

येथील जिल्हा परिषद शाळा स्वातंत्रप्राप्तीपूर्वीची जुनी शाळा आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी चालतात. खासगी शाळांच्या स्पर्धेतही या शाळेत वर्गखोल्या गच्च भराव्यात एवढी विद्यार्थी संख्या असून आजघडीला ५७० एवढी पटसंख्या आहे. स्पर्धा परीक्षा, केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात डंका आहे. गेल्या पाच- सहा वर्षांत याठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येत नाहीत.

सध्या येथे राजपत्रित मुख्याध्यापकासह अन्य पाच शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावकऱ्यांच्या वतीने वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नसल्याने गुरूवारी (ता. १५) सकाळी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन केले.

दरम्यान, देगलूरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर, मरखेलचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे, शिक्षण विस्तार अधिकारी के. एम. मणियार, श्री. झंपलवार आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. ताबडतोब दोन माध्यमिक शिक्षक नियुक्तीचे आदेश काढल्याचे सांगितले. तर अन्य दोन प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती तीन दिवसांत करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलकांनी दोन तासानंतर माघार घेतली. मैदानावर थांबलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत दाखल झाले. शेकडो नागरिक, पालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Web Title: Nanded Parents Movement Successful Markhel Zilla Parishad School Teachers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..