सुरक्षित लोकोत्सवाचा नांदेड पॅटर्न, काय आहे ते वाचा?  

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 September 2020

जिल्ह्यातील ही सर्व वैविधतता आणि सार्वजनिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनापुढे सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने आव्हानात्मक होते.

नांदेड : सोळा तालुक्यांच्या विस्तीर्ण आणि तेवढ्याच वैविधतेने नटलेल्या नांदेड जिल्ह्यातील विविध लोकोत्सव, परंपरा या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जिल्ह्यातील ही सर्व वैविधतता आणि सार्वजनिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनापुढे सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने आव्हानात्मक होते. एका बाजुला संपूर्ण जिल्हाभरात आहे ती प्रशासकीय यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या व्यवस्थापनात असल्याने जिल्ह्यात पुर्वापार चालत आलेल्या विविध धार्मिक सण, उत्सव, लोकोत्सव यांना सध्याच्या पार्श्वभुमीवर अधिक जबाबदारी पूर्ण साजरे व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नवा पॅटर्न आकारास घातला. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथील सर्व धार्मिक लोकोत्सवाचा आभ्यास करीत एक योजना आखली. गणेशोत्सव, मोहरम-ताजिया आणि इतर सण, उत्सवाला दरवर्षी सारखी गर्दी जर या कोरोनाच्या काळात गावा-गावात झाली असती तर जिल्हाभर आरोग्याच्या दृष्टिने मोठे संकट निर्माण झाले असते. हे सर्व शांततामय होण्यासाठी यावर्षीच्या सर्व लोकोत्सवाला लोकांच्याच सहभागातून सुरक्षित मार्ग काढण्याची एक योजना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आखली. 

प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन एक टिम तयार केली

महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येक वार्डनिहाय मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर आणि स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वास्तावाची जाणिव करुन दिली. यात महसूलच्या सर्व यंत्रणेसह महानगरपालिका आणि नगरपालिका, पोलिस विभाग, महावितरण विभाग, आरोग्य विभाग यांच्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन एक टिम तयार केली. या टिमच्या माध्यमातून जागरुक लोकसहभागासाठी नियोजन केल्या गेले. 

हेही वाचा नांदेडच्या ‘स्वारातीम’ विद्यापीठात ता. ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भावनात्मक साद घातली

गणेशोत्सव, मोहरम-ताजिया यात पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेत त्यांच्या नेतृत्वाला चालना देत सुरक्षित लोकोत्सवाची संकल्पना पुढे केली. विशेष म्हणजे लोकांनीही काळाची गरज ओळखत आपल्या भक्ती आणि श्रद्धेला मुरड घालत अंतरिच्या विवेकाला प्राधान्य दिले. हाच दृष्टिकोन सर्व तालुक्यांना मिळावा यासाठी त्या-त्या तालुक्याचे महसूल, पोलीस, आरोग्य आणि इतर सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांना पुढे करीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुका पातळीवर शांतता समितीच्या सदस्यांशी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भावनात्मक साद घातली. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी, जिल्हा पोलीस अधिक्षक विजकुमार मगर यांच्यासह स्वत: प्रत्यक्ष गावोगावी फिरुन लोकांच्या भेटी घेऊन आवाहन केले. या आवाहनाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद देत खऱ्या अर्थाने जागरुक नागरिकत्वाची भुमिका निभावली.

कृत्रिम तलावाची निर्मिती करुन गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले
 
याचा परिपाक जिल्ह्यातील सर्व उत्सवासह गणेशोत्सव कुठलेही गालबोट न लागता अत्यंत सुरक्षितरित्या पार पाडला. नांदेड महानगरपालिका वगळता संपूर्ण जिल्हाभरात 3 हजार 868 गणेशमुर्तींचे प्रशासनाने सुरक्षितरित्या विसर्जन केले. यात अवघ्या 237 गणेशमुर्ती या सार्वजनिक गणेश मंडळाच्या होत्या. धर्माबाद आणि हिमायतनगर येथील परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करुन गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले हे विशेष. जिल्ह्यात एकुण 237 सार्वजनिक गणेशोत्सवापैकी कंधार येथे 22, कुंडलवाडी येथे 14, किनवट येथे 17, देगलूर, धर्माबाद, नायगाव येथे केवळ 1, बिलोली येथे निरंक तर लोहा-23, उमरी 22, हदगाव 25, भोकर 23, मुखेड 14, मुदखेड 21, अर्धापूर 9, माहूर 12, हिमायतनगर येथे 32 सार्वजनिक गणेश मंडळानी गणेश मुर्तीची स्थापना केली होती.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू, वाचा नेमके कुठे काय घडले?

दरवर्षी ही संख्या साधारणता 430 ते 450 पर्यंत असते 

नांदेड शहराच्या सर्व भागात यावर्षी 192 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुर्तींची स्थापना केली होती. दरवर्षी ही संख्या साधारणता 430 ते 450 पर्यंत असते. गणेशमुर्तींचे विसर्जन निसर्गपूरकदृष्टिने व्हावे यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. नांदेड शहरासाठी 15 ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रही निर्माण केले होते. आसना, पासदगाव, नांदकसर, नावघाट, नगिनाघाट, शनिघाट, शनिघाट वसरणी, वसरणी घाट येथे एकुण सुमारे 17 हजार 765 घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण जिल्हाभरात सायंकाळी 11 वाजेपर्यंत काही अपवाद वगळता विसर्जन पूर्ण झाले होते.  

सार्वजनिक उत्सव साजरा करतांना जो संयम आणि जागरुकता दाखविली 

दरवर्षी ज्या संख्येत आणि ज्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव, गणेश मंडळ गलोगल्ली गणेशाची स्थापना करायचे याला यावर्षी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थगिती दिली. नागरिकांच्या या जागरुक वर्तणातून कोरोनाच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणात आळा घालता येणे शक्य झाले. जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक उत्सव साजरा करतांना जो संयम आणि जागरुकता दाखविली त्याबद्दल सर्वांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आभार मानले. 

शब्दांकन- विनोद रापतवार
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded pattern of safe folk festival, read what is it nanded news