नांदेड : नागरिकांकडून खुलेआम कायद्याचे उल्लंघन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded no one follow Pets record law

नांदेड : नागरिकांकडून खुलेआम कायद्याचे उल्लंघन

नांदेड : अनेकांना घरी कुत्रा, मांजर आदींसह इतर प्राणी पाळण्याची आवड आहे. हे प्राणी घरी पाळताना कायद्यानुसार त्याची नोंद असणे बंधनकारक आहे. मात्र, या कायद्याचे कुठेच पालन होत नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

कायद्यानुसार पाळीव प्राण्याची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. प्राणी पाळण्यासाठी महापालिकेचा परवाने घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाममात्र शुल्क आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हा परवाना दिला जातो. मात्र, तसे होताना दिसत नाही. शहरात बेवारस कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांची संख्या हजारात आहे. मात्र, याचा नेमका आकडा किती, याची माहिती महापालिकेकडे नाही.

शहरात अनेकांच्या घरासमोर ‘कुत्र्यांपासून सावधान’ अशा पाट्या लागलेल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाळीव कुत्रा, मांजरांच्या विशेष प्रजातीमुळे ही क्रेज वाढतीच आहे. असे असताना कुत्रा चावणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे आदी प्रकार घडत असल्याने अनेकदा भांडणाचे कारण ठरत आहे. अनेकवेळा तर प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचत आहे.

परवान्याबाबत माहितीचा अभाव

कुत्रा, मांजर पाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाना देण्यात येतो. ही बाब सोडता तो कसा उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी किती रुपये शुल्क आकारायचे, आकारायचे की नाही यासंदर्भात कुठलीही माहिती नाही. नियम आहे पण, तो केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

कुत्रा चावल्यास तक्रार करायची कुठे

पाळीव कुत्र्यांसोबत, भटक्या कुत्र्यांचीही संख्या शहरात वाढली आहे. वाहनामागे धावणे, चावा घेणे आदी प्रकार घडतात. असे असले तरी याची तक्रार नेमकी करायची कुठे? याला जबाबदार कोणाला धरायचे? भरपाई कुणाला मागायची? आदी प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहेत.

Web Title: Nanded Pets Record Mandatory By Law No One Follow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedSakallawpets
go to top