esakal | नांदेड : टंचाईवर मात करण्यासाठी पाणी वापराचे नियोजन काळाची गरज; जलस्तर घटले

बोलून बातमी शोधा

बोअरवेल

नांदेड : टंचाईवर मात करण्यासाठी पाणी वापराचे नियोजन काळाची गरज; जलस्तर घटले

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः सध्या बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल, अवेळी पाऊस, वादळवारे, बर्फवृष्टी सारखे नैसर्गिक संकटे उभे राहत आहेत. मानवाच्या वाढत्या गरजा आणि त्या गरजा भागविण्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिक तयारी, यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. दिवसेंदिवस नागरिकांनी घरोघरी बोरवेल खोदण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खाली जात असून, सध्या विहिरी तथा बोरवेल्सचा जलस्तर कमालीचा खाली गेला आहे. हा घटणारा जलस्तर वाढवण्यासाठी व पाण्याचे नियोजन करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.

शासनाकडून जलस्तर वाढवण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो. परंतु, हे पावसाचे पाणी नेमके जाते तरी कुठे? असा प्रश्‍न पडतो. वृक्षारोपण, बंधारा, शोषखड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदीवर जलस्तर वाढविण्यासाठी ग्रामीण भागात उपक्रम राबविले जातात. मात्र, यावरील उपाययोजना सत्यात उतरत नाहीत. कितीतरी पैसा यामुळे वाया जातो. मानवाच्या वाढत्या गरजा आणि त्या गरजा भागविण्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिक तयारी यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. विहीरी, बोरवेलची पातळी खोल गेली आहे. ते खोदण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे जलसाठा कमी होऊन पाण्याची पातळी कमी झाली आहे.

हेही वाचा - एकीकडे ऑक्सिजनसाठी हतबल झालेला माणूसच करतोय झाडांची कत्तल; झाडे लावा, झाडे जगवाला खीळ

शहरी, ग्रामीण तथा गावोगावी सिमेंटचे रस्ते, सिमेंटच्या नाल्या, ग्रामीण व शहरी भागात सार्वजनिक नळांना तोट्याचा अभाव यामुळे लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. या पाण्याला अडविण्याचे नियोजन होत नाही. पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे पाण्याचा जलसाठा वाढविण्यास मदत मिळत नाही. पाण्याचे साठे वाचविण्यासाठी सामाजिक, सेवाभावी संस्था, शासन व समाजसेवी मिळून प्रत्येक गावात किमान मानस कृतीत आणावा व भविष्यात येणाऱ्या जल संकटाचा सामना करावा. जल संकटाचे भान ठेवून या उपक्रमांचा सर्वांनी विचार करणे काळाची गरज आहे.

पाण्यासाठी होत आहे जमिनीची चाळणी

दररोज नवीन प्लॉटिंग, सोसायटी, वसाहती तयार होत आहेत. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसते, त्यामुळे जितके प्लॉट तितके बोर असे समिकरण झाल्याने शहरी व ग्रामीण भागातही जमिनीची चाळणी होत आहे. जमिनीत पाणीच नसल्याने अनेक भागात तीनशे-चारशे फुटावर सुद्धा धुरळाच बाहेर येत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

पाण्याचे नियोजन व्हावे

सध्या उन्हाळा सुरु असून, बोअरवेल्स, विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून, ही पातळी कायम ठेवण्यासाठी पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन व्हावे त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.

- रामेश्वर वाळके (जलतज्ज्ञ)

संपादन- प्रल्हाद कांबळे