
नांदेडला लवकरच पोलिस आयुक्तालय ?
नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी पोलिस आयुक्तालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. त्याचबरोबर प्रस्तावही प्रलंबित होता. त्यामुळे नांदेडला पोलिस आयुक्तालयाबाबत मंत्रीमंडळासमोर होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव मांडून तो अंतिम करून घेऊ, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी नांदेडला आल्यावर मुख्य सचखंड गुरूद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा शिरोपाव देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह गुरूद्वारातील अधिकारी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर श्री. वळसे पाटील यांनी हत्या झालेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांची पत्नी व मुलाची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
श्री. वळसे पाटील म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाची मागणी लवकरच मंजूर होईल. नांदेड जिल्हा मोठा असून जिल्ह्यात जवळपास ३६ पोलिस ठाणे आहेत. त्यामुळे त्याचा कामकाजाचा भार एकट्या पोलिस अधीक्षकांवर येतो. त्यामुळे शहरातील १२ ते १४ पोलिस ठाणे एकत्र करून या ठिकाणी पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव आहे. त्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक बियाणी यांच्या हत्येसंदर्भातील तपास सीबीआयकडे देण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलिस सक्षम आहेत. तपासाबाबत आम्ही समाधानी असून योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बियाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून खासगीत झालेली चर्चा जाहीर करणे योग्य नाही. त्यांचाही पोलिसांवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Nanded Police Commissionerate Proposal Tabled In Cabinet Meeting Dilip Walse Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..