नांदेड : पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

अनिल कदम
Tuesday, 26 January 2021

पोलिस शिपाई ते निरीक्षक असा प्रवास करणारे श्री धबडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर. देगलूर येथील कार्यकाळात राष्ट्रपती पदक मिळवणारे धबडगे ठरले दुसरे अधिकारी.

देगलूर (जिल्हा नांदेड ) : येथील पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ दिला जाणारा अगदी मानाचा समजला जाणारा राष्ट्रपती पोलिस पदक सोमवारी (ता. २५) रोजी जाहीर करण्यात आल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

देगलूर येथील कार्यकाळात राष्ट्रपती पदक मिळवणारे ते दुसरे अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी ज्येष्ठ पोलिस निरीक्षक श्री मोहसीनखान हे या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. भगवान धबडगे हे १९८८ मध्ये पोलिस खात्यात शिपाई पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांना खात्यांतर्गत परीक्षेद्वारे उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. सन २०१७ मध्ये ते पोलिस निरीक्षक म्हणून खात्यात रुजू झाले. या काळात त्यांना राज्यातील वाशिम, औरंगाबाद, परभणी, लातूर या जिल्ह्यात सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी जिथे गेले तेथे कर्तव्य काळात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. अत्यंत क्लिष्ट प्रकरणातील गुन्ह्याचा शोध लावल्याने ते लातूर गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना विशेष सेवा पदक मिळाले होते. त्यानंतर त्यांना पोलिस महासंचालकाचे ही विशेष पदक मिळालेले आहे.

गेल्या आठ महिन्यापूर्वी ते देगलूर पोलिस ठाणे येथे रुजू झाले. मात्र त्यांची अचानक बदली करण्यात आली होती. सेवाकाळ पूर्ण न झाल्याने त्यांनी मॅट मधुन पुन्हा देगलूर पोलिस ठाणे मिळविले. सोमवारी (ता. २५) रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदक पुरस्कारात त्यांचे नाव आल्याने त्यांचे देगलूर येथे अभिनंदन केले जात आहे. भगवानराव धबडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याने त्यांचे आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार सुभाष साबणे ,नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रीतम देशमुख हानेगावकर, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अंकूश देसाई देगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कंनकटे, मराठा सेवा संघाचे ॲड. रमेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Police Inspector Bhagwan Dhabdage has been awarded the President's Police Medal nanded news