नांदेडमध्ये भजन गायनातूनच वीरशैव समाजाचीही होतेय प्रगती

प्रमोद चौधरी
Sunday, 6 September 2020

स्वतःच्या जिद्दीवर गायनाची कला शिकून हडको पी-वन येथील वीर वैरागिनी अक्का महादेवी महिला मंडळातील सदस्या नियमित भजनगायनासोबतच वीरशैव समाजाचा प्रचार, प्रसारही करत आहेत.

नांदेड : अलिकडे धर्माचे राजकारण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात, समाजात त्याचे पडसाद दिसून येतात. त्यामुळे आपल्या धर्मातील सर्व समाजबांधवांनी एकोप्याने राहून धर्माच्या प्रगतीसाठी लढणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आपला धर्म टिकून राहावा, आपल्या समाजातील सर्व पुरुष, महिला, युवक-युवती एकत्र येवून धर्माची शैक्षणिक, आर्थिक प्रगती कशी साधावी, म्हणून प्रयत्न करीत आहेत. हडको पी-वन येथील वीर वैरागीनी अक्का महादेवी महिला मंडळातील सदस्यांचा हा प्रयत्न खरोखरच इतरांना प्रेरणा देणारा ठरेल.

हेही वाचा - नांदेड जिल्हयातील तांड्यांचा चेहरा-मोहरा बदलणार, कसा? ते वाचाच

वीरशैव लिंगायत हा प्राचीन धर्म आहे. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजातील एक महत्त्वाची विभूती आहे. बसवेश्वर हे शंकराच्या नंदीचा अवतार असल्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे. महात्मा बसवेश्वर, मन्मथ स्वामी यांच्या विचारांचा त्यांचे समाजासाठीचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी हडको पी-वन येथील वीर वैरागिनी अक्का महादेवी महिला भजन मंडळातील सदस्या अखंडित भजनाच्या माध्यमातून जागर करीत आहेत. 

हे देखील वाचाच - शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : आता असा असणार सातबारा, वाचा सविस्तर

संगीता कार्लेकर यांचा आहे पुढाकार
सुरुवातीला समाजातील सर्व महिला एकत्रित येवून भजन-गायन करीत. हे करीत असताना एकमेकींचे सुख-दुःख जाणून घेवून, त्यावर विचारमंथन करायचे. कालांतराने मंडळ स्थापन्याची कल्पना मंडळातील संगीता परमेश्वर कार्लेकर यांनी महिलांसमोर मांडली. त्याला प्रतिसाद मिळाल्याने २०१५ मध्ये मंडळाची स्थापना झाली. लहानपणापासूनच गायनाची आवड असल्याने मंडळातील सर्व महिलांना भजन-गायन संगीता कार्लेकर यांनी शिकवले. आज मंडळातील सर्वच महिला तबला, हार्मोनिअमवर ताला-सुरामध्ये, एकसारखे टाळ वाजून भजन गायन करतात.

येथे क्लिक कराच - तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
 

महिलांचे होते एकत्रिकरण
वीरशैव समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठीचे प्रयत्न, हेच मंडळाचे वैशिष्ट्य आहे. महात्मा बसवेश्वर, मन्मथ स्वामी जयंती, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी आदी उत्सवांसोबतच कोजागिरी पौर्णिमाही मंडळातर्फे साजरी होते. हरतालिका, संक्रांतीनिमित्त सामुदायिक हळदी कुंकू कार्यक्रमांतून महिलांचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून होतो आहे.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह

वेगळी ओळख केली निर्माण 
शहरासह परिसरातील कीर्तन सोहळे, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मंडळातील सर्व महिलांचा नियमित सहभाग असतो. आतापर्यंत कार्ला, निवघा, शिराढोण, कापसी, उस्माननगर, काटकळंबा, कृष्णूर, जिंदनगर, गोपाळवाडी, रामनगर आदी ठिकाणी मंडळाने हजेरी लावून पदे, भारूड आणि गौळणी सादरीकरणातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded The Progress The Veershaiva Community Nanded News