नांदेड : ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

प्रल्हाद कांबळे
Thursday, 14 January 2021

सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे.

नांदेड :- जिल्ह्यात 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी शुक्रवार 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 18 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

 

या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने 15 जानेवारी रोजी जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रावर 15 जानेवारी रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 18 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Prohibition order in Gram Panchayat polling, counting center area nanded news