Nanded : रेल्वे पूल केव्हा सुरू होणार? शेतकऱ्यांचा रुळावरून जीवघेणा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे

Nanded : रेल्वे पूल केव्हा सुरू होणार? शेतकऱ्यांचा रुळावरून जीवघेणा प्रवास

बारड : रेल्वे पाथरड (ता. मुदखेड) येथील रेल्वे पुलाचे काम पूर्ण होऊनही प्रवासासाठी पूल खुला करण्यात येत नसल्याने ग्रामस्थ, प्रवासी आणि शेतकऱ्यांना रेल्वेच्या रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे येणाऱ्या रेल्वे पाथरड येथील मुख्य रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम मागच्या दोन वर्षांपासून सुरू असून पुलाच्या निर्मितीनंतरही मुख्य रस्त्यावरील पूल अंतर्गत वाहतूक सुरू झाली नसल्याने प्रवासी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवासी नागरिक, शेतकरी त्रस्त असून रुळावरील जीवघेणा प्रवास केव्हा बंद होणार या विवंचनेत आहेत. तसेच शेतकरी आपला शेतमाल बैलगाडीतून आणून रेल्वे रुळाच्या अलीकडे उतरून घेत रिकामी बैलगाडी रुळावरून पलीकडे घेऊन जात पुन्हा शेतमाल डोक्यावरून नेत बैलगाडीमध्ये टाकून घरापर्यंत पोहचवत असल्याने मागच्या एक वर्षाहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे, जनावरांचे मोठे हाल सुरू आहेत.

वाहतुकीचा पुल सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना, गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना जे हाल सोसावे लागत आहेत त्यास कंटाळून आता रेल्वे पाथरड येथील ग्रामस्थांनी लवकरात लवकर रेल्वे पूल सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करीत ता.१४ नोव्हेंबर पर्यंत प्रश्न मार्गी लावावा अन्यथा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सरपंच कैलास पाटील अवातिरक, उपसरपंच जयवंतराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.१४) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याने सुस्त असलेली शासकीय यंत्रणा जागी होणार का? हेच पाहावे लागेल.

गेली दीड वर्षे झाली वाहतुकीसाठी पूल सुरू न झाल्याने जीवघेणा प्रवास चालू असून मुख्य रस्त्यावरील प्रवास्यांची वाताहत पहावत नसून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर पुलाची वाहतूक सुरू करावी अन्यथा आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही.

- कैलास पाटील अवातिरक, सरपंच, रेल्वे पाथरड