नांदेड : निरोगी आयुष्‍यासाठी नियमित शौचालयाचा वापर आवश्‍यक- मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

प्रल्हाद कांबळे
Thursday, 19 November 2020

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज गुरुवार दिनांक 19 नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हयातील सर्व गावांमधून स्‍वच्‍छतेचे उपक्रम राबविण्‍यात आले आहेत. नांदेड तालुक्‍यातील चिमेगाव येथे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शौचालयाची पाहणी करुन गावक-यांशी संवाद साधला,

नांदेड - आरोग्‍य संपन्‍न जीवन जगण्‍यासाठी जशी उत्‍तम आहाराची गरज आहे. तसेच स्‍वच्‍छ वातावरणाची देखील आवश्‍यकता आहे. निसर्गाने आपल्‍याला स्‍वच्‍छ पाणी, स्‍वच्‍छ हवा व स्‍वच्‍छ अन्‍नधान्‍य दिले असले तरी मानवाच्‍या उघडया शौचविधीमुळे हवा, पाणी व अन्‍नधान्‍य दूषित होत आहे आणि पावसाच्‍या पडणा-या पाण्‍यात ही मैला मिसळली गेल्‍यामुळे त्‍याचे अनेक दुष्‍परिणाम होत असतात. उघडया हागणदारीमुळे देखील वातावरणात दूर्गंधी पसरुन अनेक आजाराला आपण निमंत्रण देत आहोत. निरोगी राहण्‍यासाठी नागरिकांनी नियमित शौचालयाचा वापर करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले आहे.

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज गुरुवार (ता. १९)  नोव्‍हेंबर रोजी जिल्‍ह्यातील सर्व गावांमधून स्‍वच्‍छतेचे उपक्रम राबविण्‍यात आले आहेत. नांदेड तालुक्‍यातील चिमेगाव येथे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शौचालयाची पाहणी करुन गावक-यांशी संवाद साधला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी गट विकास अधिकारी राजू तोटावाड, सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा -  इंदिरा गांधी देशासाठी कार्य करणार्‍या महान नेत्या- गुणवंत मिसलवाड -

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, संयुक्‍त राष्‍ट्रसंघातर्फे ता. १९ नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक शोचालय दिन म्‍हणून जाहीर केला आहे. त्‍यानिमित्‍त सर्वत्र स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देण्‍यात येत आहे. आज कित्‍येक स्‍त्री-पुरुष उघडयावर शौचास बसतात ही लाजिरवाणी बाब आहे. उघडयावरील शौचविधीमुळे मोठया प्रमाणात रोगराई पसरते. महिलांचीही मोठी कुचंबना होते. त्‍यासाठी प्रत्‍येकाकडे शौचालय असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. नुसते शौचालय असून चालणार नाही तर त्‍याचा नियमित वापर केल्‍यास गावे रोगमुक्‍त, दुर्गंधीमुक्‍त होतील. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर मास्‍कचा वापर, दोन व्‍यक्‍तींमधील सुरक्षित आंतर व नियमित हात धुणे या त्रिसुत्रिचा वापर करावा, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

यावेळी शौचालय वापराबाबत गृहभेटी करुन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी महिलांशी संवाद साधला. शाळेतील स्‍वच्‍छता संकुलाची पाहणी करुन पाण्‍याच्‍या टाकीला नळ जोडणी करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. जल शुध्‍दीकरण प्‍लांटलाही भेट दिली. यावेळी त्‍यांनी शालेय विद्यार्थ्‍यांना गृहभेटीतून संवाद साधला. प्रारंभी माजी पंतप्रधान स्‍वर्गीय इंदीरा गांधी व झासीची राणी लक्ष्‍मीबाई यांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले. त्‍यानंतर उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ देण्‍यात आली. यावेळी विस्‍तार अधिकारी दिलीप बच्‍चेवार, सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्‍यवहारे, नंदलाल लोकडे, महेंद्र वाठोरे, कृष्‍णा गोपिवार, ग्रामसेवक व्‍ही.एम. बोंडावार, गट समन्‍वयक चंद्रमुनी कांबळे यांच्‍यासह ग्रामस्‍थांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Regular toilet use is essential for a healthy life Chief Executive Officer Varsha Thakur nanded news